विद्यापीठातर्फे ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी फाऊंडेशन कोर्स’ उपक्रमाला सुरूवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरीता ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी फाऊंडेशन कोर्स’ हा ऑनलाईन उपक्रम सुरु होत असून या मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत अभ्यासक्रमावर आधारित एकूण ३०० मार्गदर्शन वर्ग ऑनलाईन मोडमध्ये घेतले जाणार आहे. त्यासाठी झूम (Zoom)  अॅपचा वापर केला जाईल. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा केंद्राच्या सल्लागार समितीने या पध्दतीचा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला व व्यवस्थापन परिषेदेने त्याला यापूर्वीच मंजूरी दिली आहे.

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील प्रवेशित किंवा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेवू शकतील. त्यासाठी १०० रूपये प्रवेश फी ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून स्वीकारली जाईल. दररोज संध्याकाळी ९० मिनिटांची एक तासिका या पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. प्रारंभीच्या काही तासिका या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, पात्रता व निकष यावर आधारित असतील. त्यानंतर अध्ययन कौशल्यावर आधारित तासिका घेतल्या जातील. प्रवेशित विद्यार्थ्यांना ऑनलाईन हजर राहणे आवश्यक असेल. या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे. सर्व तासिकांचे रेकॉर्डिंग करून विद्यार्थ्यांसाठी युटूब चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या समन्यकांशी अथवा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (0257-2257411) किंवा  संचालक विद्यार्थी विकास विभाग (0257-2257418/419) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक डॉ. अजय सुरवाडे यांनी केले आहे.

Protected Content