कार ट्रान्सफर प्रकरणी तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी | आमदार संजय सावकारे यांची कार परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर ट्रान्सफर केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण खूप गाजले असून याची गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी अशोक विठ्ठल पाटील, अकिल शेख रहमान शेख, प्रशांत जगन्नाथ भोळे या तिघांना अटक केली आहे.

या प्रकरणी आधीच दक्षता समितीमधील सहायक परिवहन आयुक्त दिनकर मनवर व राजेंद्र मदने या यांनी आरटीओ कार्यालयात झाडाझडती घेतली. यानंतर जे. बी. कुलकर्णी, गणेश देवरे, सुनील पाटील व मनोज पाटील या चार लिपिकांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चौकशीअंती तीन जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी दिली.

कार ट्रान्सफर प्रकरणात खोटेनगरातील अशोक पाटील यांचा मोबाइल वापरला गेला आहे. आरटीओ एजंट पप्पू भोळेने हा मोबाइल वापरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर अकिल नावाच्या एजंटने त्यांचा मोबाइल नंबर अपडेट करून दिला असल्याची तांत्रिक माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार या तिन्ही जणांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

Protected Content