जळगावातील गोळीबार म्हणजे टोळीयुध्दाची नांदी तर नव्हे ना !

जळगाव, जितेंद्र कोतवाल | शहरातील कांचन नगर भागात आज सकाळी झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडालेली असतांनाच पोलीसांनी तपासाची सूत्रे फिरवली असून संशयित नजरेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे आरोपी लवकरच ताब्यात येतीलच; तथापि, शहरात सुरू झालेले सूडचक्र ही टोळीयुध्दाची नांदी तर नव्हे ना ? हा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

आज सकाळी आठच्या सुमारास कांचनगर भागातील रहिवासी आकाश मुरलीधर सपकाळे या तरूणाच्या थेट घरात शिरून अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. यातील एक हल्लेखोर हा पळतांना पायरीवरून घसरून पडल्यामुळे घटनास्थळीचे बेशुध्द पडल्याने त्याच्यासह त्याच्या संभाव्य साथीदारांची ओळख पटली आहे. लवकरच इतर आरोपी गजाआड होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक होईल, पुढील न्यायालयीन सोपस्कार पार पडतील. www.livetrends.news मात्र ही घटना जळगावच्या गुन्हेगारी विश्‍वातील टोळीयुध्दाची नांदी तर नव्हे ना ? ही शंका आता पोलीस यंत्रणेला नक्कीच पडली असेल.

आज ज्याच्या घरात घुसुन गोळीबार करण्यात आला तो आकाश मुरलीधर सपकाळे हा कुख्यात लाडू गँगचा म्होरक्या असून त्याच्यावर आधी अनेक गुन्हे दाखल आहेत. माजी महापौर अशोक सपकाळे यांचा चिरंजीव राकेश अशोक सपकाळे याच्या खूनातील तो प्रमुख आरोपी असून सध्या जामीनावर बाहेर आलेला आहे. अशोक सपकाळेंची मुले आणि आकाश सपकाळेची लाडू गँग यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याचे तेव्हा पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

आज सकाळी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलतांना राकेश सपकाळे याच्या कुटुंबियांनी या हल्ल्याचा थरारक तपशील दिलेला आहे. आपण याची बातमी येथे क्लिक करून वाचू शकतात. तर या संदर्भातील व्हिडीओ येथे क्लिक करून पाहू शकतात. या सर्वांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे आज पूर्ण तयारीनिशीच आले होते. त्यांच्याकडे गावठी कट्टे व चॉपरसह शस्त्रे होती. त्यांनी घरात घुसून अंधाधुंद गोळीबार केला. मात्र सुुदैवाने आकाशच्या करंगळीला जखम वगळता त्याला इजा झाली नाही. दुसरे सुदैवे म्हणजे एक हल्लेखोर परत धावतांना पायरीवरून घसरून पडल्याने घटनास्थळीच बेशुध्द झाला. यामुळे या गुन्ह्याच्या तपासाची लवकर उकल होणार आहे.

या सर्व घटनांचा www.livetrends.news तपशील जाणून घेतला असता, लाडू गँगच्या वर्चस्वाला तडाखा देण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राकेश अशोक सपकाळे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. यातून जळगावात आता या दोन गटांमध्ये सूडचक्र सुरू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. शहरातील टोळीयुध्दाची ही नांदी तर नव्हे ना ? हा संशय आता व्यक्त करण्यात येत असून तो नक्कीच अनाठायी नाहीच…!

Protected Content