वायरमनला मारहाण करणार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील खडकदेवळा येथे सेवा बजावणार्‍या वायरमनला मारहाण केल्या प्रकरणी आज एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विज वितरण कंपनीच्या पाचोरा ग्रामीण कक्षात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले गणेश दत्तु महाजन (रा. मोरया कन्स्ट्रक्शन, पाचोरा) यांच्याकडे तालुक्यातील वाघुरखेडा, चिंचखेडा बु व खडकदेवळा बु असे कार्यक्षेत्र निर्धारित केले आहे. दि. १३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गणेश महाजन हे खडकदेवळा बुद्रुक या गावात थकीत विजबिल वसुली संदर्भात ग्राहकांना विज भरण्याबाबत माहिती देत होते.

दरम्यान, दत्तवाडी, भिला तात्यानगर जवळ येथील सुभाष सुरेश ठाकरे यांनी गणेश महाजन यांचे जवळ येऊन अरेरावीची भाषा करत गणेश महाजन यांची गचांडी धरत त्यांना मोटरसायकल वरुन खाली पाडले. व चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी तंटा सोडविण्याचा प्रयत्न केला. गणेश महाजन यांनी तात्काळ सहाय्यक अभियंता दिपक पाटील यांना घडलेला प्रकार सांगितला असता दिपक पाटील हे घटनास्थळी पोहोचले. व त्यांनी देखील सुभाष ठाकरे यांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु सुभाष ठाकरे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसुन अरेरावी करत गणेश ठाकरे यांना मारहाण केली. 

यानंतर वायरमन गणेश महाजन यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत सुभाष सुरेश ठाकरे याचे विरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण करुन सेवा बजावत असतांना मारहाण करत जीवठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पो. हे. कॉ. हंसराज मोरे हे करीत आहेत.

 

Protected Content