चारधाम यात्रा उद्यापासून सुरू होणार

डेहरादून वृत्तसंस्था | उद्यापासून चारधाम यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चारधाम यात्रेवर बंदी घालण्यात आली होती. आज चारधाम यात्रेला दिलेली स्थगिती उठवतानाच, करोनाविषयक नियमांचे कठोर पालन करून ही यात्रा पार पाडावी, असे निर्देश उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिलेले आहेत. मंदिरांना भेट देणार्‍या भाविकांच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा घालण्यासारख्या निर्बंधांसह ही यात्रा सुरू होईल, असे मुख्य न्यायाधीश आर.एस. चौहान व न्या. आलोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने यात्रेवरील बंदी उठवताना सांगितलेले आहे. कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आणि लसीकरण प्रमाणपत्र यात्रेकरूंसाठी अनिवार्य राहील, असेही न्यायालय म्हटले आहे.

चारधामम म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिमालयातील या प्रसिद्ध मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या दैनंदिन संख्येवर न्यायालयाने मर्यादा घातली. केदारनाथ धाममध्ये दररोज ८००, बद्रीनाथ धाममध्ये १२००, गंगोत्रीत ६००, तर यमुनोत्रीत ४०० भाविकांना प्रवेश दिला जाईल, असे न्यायालयाने ठरवून दिले. मंदिरांभोवती असलेल्या कुंडांमध्ये स्नान करण्याची यात्रेकरूंना परवानगी दिली जाणार नाही असेही न्यायालयाने सांगितले.

 

Protected Content