नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख बदलली आहे. आता ५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. यापूर्वी १ ऑक्टोबरला मतदान होणार होते. मात्र जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या तारखेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जम्मू व काश्मीर विधानसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांतील निवडणुकांचे निकाल ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रीय राजकीय पक्ष, राज्य राजकीय पक्ष आणि अखिल भारतीय बिश्नोई महासभेकडून मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली होती. हरियाणातील बिश्नोई समुदायातील लोक शतकानुशतके जुन्या असोज अमावस्या उत्सवात सहभागी होण्यासाठी राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्याची निवेदने आयोगाला प्राप्त झाली आहेत. यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता होती. असे निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.