बोदवड प्रतिनिधी । एकनाथ खडसे यांनी कार्यकर्ते वा मतदारसंघाचे नव्हे तर फक्त आपल्या कुटुंबाचे हित पाहिले असून ते एक नंबरचे अप्पलपोटे असल्याची टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते नाडगाव येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
तालुक्यातील नाडगाव रेल्वे स्टेशन येथे रविवारी जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती म्हणून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मनोगतातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, खडसे यांनी कायम आपल्या राजकारणात आपल्या कार्यकर्त्यांचा विचार न करता आपल्या कुटुंबियांनाच मोठं केले. त्यामुळे ते एक नंबरचे अप्पलपोटे असल्याचा आरोप आ.पाटील यांना केला. जे पक्ष सोडण्याचा निर्णय घेवू शकतात व सांगतात माझा काही भरवसा नाही असे सांगतात अशा व्यक्तीला काय म्हणाव ? राजकारणात करोडो रुपयांची मालमत्ता जमविली कशी याचं उत्तर खडसेंनी द्यावे असे आवाहन करतांना ते शोकसभेतही आपली टिमकी वाजवत असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली.
दरम्यान, मुक्ताईनगर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असून येत्या सहा महिन्यांत पाण्याचा,विद्यार्थाचा,शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर विरेंद्रसिंग पाटील, मेहबूब शेख, डॉ. उध्दव पाटील, विनोद मायकर,भारत पाटील,सागर पाटील,डॉ.सुधीर पाटील, ईश्वर जंगले, अजय गवळी, आधारसिंग पाटील आदी उपस्थित होते.