उपनगराध्यक्षांवर अविश्‍वास प्रस्ताव: चाळीसगाव नगरपालिकेच्या उद्याच्या सभेकडे लक्ष

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्षा सौ. आशाबाई रमेश चव्हाण यांच्या विरूध्द अविश्‍वास प्रस्तावासाठी उद्या सभा बोलावण्यात आली असून यात नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चाळीसगाव नगरपालिकेत सध्या शह-काटशहाचे राजकारण चांगलेच रंगल्याचे दिसून येत आहे. शहरातील नागरी सुविधांबाबत कुणी बोलण्यास तयार नसतांना एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न होत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. याचाच पुढील अध्याय उपनगराध्यक्ष सौ. आशाबाई रमेश चव्हाण यांच्यावरील अविश्‍वासाच्या प्रस्तावातून समोर आला आहे.

गत वर्षाच्या शेवटी अर्थात ३० डिसेंबर रोजी भाजपचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, आघाडीचे नगरसेवक आनंदा चिंधा कोळी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्याचे पत्र दिले आहे. या ठरावावर चर्चा करण्यासाठी ४ जानेवारीला सकाळी ११ वाजता पालिकेची सभा बोलावण्यात आली आहे.

उपनगराध्यक्षा आशा चव्हाण या शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश विक्रम चव्हाण यांच्या पत्नी असून अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. यामुळे आता त्यांच्यावर आणलेला अविश्‍वास प्रस्ताव पारीत होतो की बारगळतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी नगराध्यक्षांवर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्याचे प्रयत्न फसले असतांना आता उपनगराध्यक्षा पायउतार होणार की, ही खेळी उलटणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content