आमदार भोळे यांची आढावा बैठकीत १ कोटींचा निधी देण्याची घोषणा

 

जळगाव, प्रतिनिधी  । शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आ. राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी कोरोनावरील उपाययोजनासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. 

आमदार निधीतून १ कोटी कोविडसाठी जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकिय सेवा – सुविधा उभारण्यासाठी देण्याची घोषणा यावेळी  आ. राजूमामा भोळे यांनी केली. सर्वांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सेवाकार्य करण्याची ही संधी असल्याचे मत या वेळी व्यक्त केले.  

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मनपा उपायुक्त गोसावी , कपिल पवार, नगरसेवक  सुनील महाजन , भाजप गटनेते भगत बालाणी,  नगरसेवक विशाल त्रिपाठी,  नगरसेवक कुंदन काळे ,मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.शिरीष  ठुसे ,  मनपा वैद्यकीय अधीक्षक राम रावलानी, विजय घोलप आदींची उपस्थिती होती.

बैठकीत महापौर जयश्री महाजन यांनी महापालिका प्रशासनातर्फे  प्रत्येक वार्डात राबविण्यात येत असलेल्या कोरोना चाचणी कॅम्पबाबत सूचना केल्यात. या  कॅम्पला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत असल्याचे निदर्शनास आणून देत  अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्येक घरात जाऊन कोरोना चाचणीबाबत जनजागृती करून चाचणीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्यात.

आमदार भोळे यांनी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर देणे व कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले. बैठकीत शहरांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्तीत जास्त भर दिला जावा,  तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता १४  दिवस विलगीकरणात रहाणे बंधनकारक करण्यात आला असून यामुळे  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होणार आहे.  कोवीड केअर सेंटर मधून काही रुग्णांनी जेवणा संबंधित तक्रारी केल्या होत्या,  त्यामुळे आता कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना  पोषक , चांगल्या दर्जाचे आणि वेळेवर जेवण देण्यात यावे,अशा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीमध्ये केल्या आहेत.

कोवीड केअर सेंटरमधील रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तम त्या केली जावी, असेही बैठकीमध्ये सूचित करण्यात आले.  खाजगी रुग्णालय कोविड रुग्णांकडून अवाढव्य बिल आकारात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर खाजगी रुग्णालयांनी असे बील आकारू नये, अन्यथा दोषींवर कारवाई करण्यात येईल. असा इशाराही कोरोना आढावा बैठकीत खाजगी रुग्णालयांना देण्यात आला आहे.

राज्यात सध्या  रेमडीसीव्हरचा तुटवडा आहे . त्यामुळे डॉक्टरांनी  रेमडीसीव्हर संबंधित शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून जिथे अति जास्त आवश्यकता असेल, तिथेच  रेमडीसीव्हरचा  वापर करावा, कारण सर्वच कोरोनाबाधितांना  रेमडीसीव्हरची आवश्यकता नसते, रुग्ण अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत असेल, तरच रेमडीसीव्हरचा वापर करण्यात यावा . अशा सूचनाही बैठकीत  डॉक्टरांना देण्यात आल्या.

 

Protected Content