रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा : आ. मंगेश चव्हाण यांची मागणी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे जलद रेल्वेचा थांबा नसल्यासह रेल्वे प्रवाशांना विविध समस्या भेडसावत असून याचे निराकरण करण्याची मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालना येथे भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात महानगरी, महाराष्ट्र व कुशीनगर एक्स्प्रेस गाड्यांची येथील आगमनाची वेळ सकाळी ६ ऐवजी ७ वाजेची करा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव येथून जळगाव जिल्हा मुख्यालय हे जवळपास १०० किमी अंतरावर असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह नियमित अपडाऊन करणार्‍या प्रवाशांना रेल्वे प्रवास अतिशय सोयीचे माध्यम आहे. मात्र कोविड काळानंतर येथील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बरेच बदलल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी कारणांसाठी नियमित अपडाऊन करणार्‍या प्रवाशांना बसला आहे. याबाबत रेल्वे प्रवासी संघटनांनी माझ्याकडे त्यांना येणार्‍या समस्या मांडल्या. महानगरी, महाराष्ट्र व कुशीनगरी एक्स्प्रेस यांची वेळ पूर्ववत करण्यासह देवळाली-भुसावळ पॅसेंजर मुंबई किंवा कल्याणपर्यंत न्यावी, अपडाऊन करणार्‍यांसाठी मासिक पास सुरू करण्यात यावा, मुंबई-भुसावळ पॅसेंजर पूर्ववत सुरू करून मुंबईपर्यंत वाढवावी, तालुक्यातील रोहिणी स्थानकावरील दोन्ही पॅसेंजर शटलचा थांबा पूर्ववत सुरू करावा, कारण या स्थानकाशी १० ते १२ गावे जोडली असून तेथील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी व नोकरदार मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाशी जोडले आहेत, असे निवेदनात नमूद केले.

रेल्वेच्या या समस्यांचे ना. रावसाहेब दानवे यांनी तातडीने निराकरण करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी या निवेदनात केली आहे.

Protected Content