अतिवृष्टीने बोढरे येथील पुलावरील रस्ता गेला वाहून

चाळीसगाव प्रतिनिधी | सोमवारच्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील बोढरे येथे पुलावरील रस्ताच वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय होत आहेत. यामुळे पुलावरील रस्त्यांचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगावात ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या ढगफुटीमुळे तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्याची झळ अद्यापपर्यंत सोसावे लागत असताना पावसाने पुन्हा एकदा उग्ररूप धारण केले आहेत. सोमवारच्या मध्यरात्रीपासून पाऊसाने पुन्हा जोर धरलेला आहे. यामुळे शहरासह तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

एका महिन्यात तालुक्याला पूरस्थितीचा पाचव्यांदा फटका बसला आहे. दरम्यान तालुक्यातील बोढरे येथील नागरिक हे बोढरे ते हरीनगर दरम्यानच्या पुलावरून शहराकडे नेहमी ये-जा करीत असतात. मात्र सोमवार रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलावरील रस्ताच वाहून गेल्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले आहेत. यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत.

या पुलावरून नागरिकांना प्रवास करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे एखाद्याला दुखापत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असे लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलताना नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे सदर पुलावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

Protected Content