महाराष्ट्रात जल विद्यापीठाची स्थापना करा : खा. उन्मेष पाटलांनी मांडले विधेयक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जल हेच जीवन मानले जात असल्याने याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रात जल विद्यापीठ स्थापन करावे अशी आग्रही मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी लोकसभेत केली.

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आज लोकसभेत तीन खासगी विधेयके सादर केली. यातील पहिल्या विधेयकात त्यांनी जल विद्यापीठाची मागणी केली. देशात आजवर अनेक कृषी विद्यापीठे असून वन विद्यापीठ देखील आहे. तथापि, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असणार्‍या पाण्याबाबत अध्ययन करण्यासाठी विद्यापीठ नसल्याची खंत खासदार पाटील यांनी आज व्यक्त केली. या अनुषंगाने महाराष्ट्रात जल विद्यापीठ सुरू करण्यात यावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या विद्यापीठात पाण्याशी संबंधीत सर्व बाबी तसेच जलसंवर्धन, भूमिगत जल आदींचे अध्ययन करण्याची सुविधा प्रदान करण्यात येईल अशी माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली.

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी अलीकडच्या कालखंडात जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. त्यांनी गिरणा परिक्रमेच्या माध्यमातून या नदीला पुनरूज्जीवीत करण्याचा संकल्प केला आहे. यासोबत त्यांनी गिरणा वॉटर कप या अनोख्या स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची एक मोठी चळवळ सुरू केली आहे. या पाठोपाठ त्यांनी जल विद्यापीठ उभारण्यात यावे अशी मागणी केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

दरम्यान, यासोबत खासदार पाटील यांनी दोन विधेयके मांडली. यातील एकात त्यांनी शेतमजुरांच्या कल्याण आणि संरक्षणाचे विधेयक मांडले. यातून देशातील सर्वात मोठा पण पूर्णपणे असंघटीत असणार्‍या क्षेत्रातील कोट्यवधी लोकांना लाभ होणार आहे. यासोबत त्यांनी क्रिमीनल प्रोसीजर कोड १९७३ मधील काही कलमांमध्ये सुधारणा करण्यात यावे यासाठी देखील स्वतंत्र विधेयक सादर केले.

Protected Content