अजित पवार बारामतीमधून डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार

बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आगामी लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक मोठी लढत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकामेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक प्रतिष्ठा आणि अस्तित्वाची बनली आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे उमेदवार आहेत, तर महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. अशातच आता अजित पवार हे स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी कोणताही दगा फटका होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून अजित पवार हे महायुतीचे डमी उमेदवार असणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करून रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यामध्ये मोठी जाहीर सभादेखील होणार आहे. सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणारच आहेत. मात्र, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहू नये, म्हणून पर्यायी उमेदवार म्हणून स्वतः अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्याबरोबरच अजित पवार यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आला आहे.

Protected Content