गिरणा धरणातून होणार विसर्ग : सतर्कतेचा इशारा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे आज दुपारी गिरणा धरणातून पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील प्रमुख नदी असणार्‍या तापी नदीवरील हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर आता गिरणा धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या इशार्‍यात म्हटले आहे की, गिरणा धरणात दुपार पर्यंत ८० टक्के जिवंत साठा होणार आहे. तसेच वरून येणारा पुर पाण्याची आवक पाहता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरणा धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी असा इशारा येत दिलेला आहे.

दरम्यान, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणार्‍या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल.साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २०००० क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणार्‍या येवानुसार विसर्ग १००००० क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तो येणार्‍या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो ,तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव यांनी केले आहे.

Protected Content