ब्रेकींग : गिरणा धरण फुल्ल होण्याची हॅटट्रीक ! पाण्याचा विसर्ग सुरू

चाळीसगाव प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरण हे आज सकाळी पूर्ण भरले असून यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. लागोपाठ तिसर्‍या वर्षी हे धरण भरले आहे.

यंदा गिरणा धरण भरेल की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र ऑगस्ट महिन्यातील जोरदार पावसामुळे धरणातील जलसाठा वाढला. यातच गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला. यातच ठेंगोडा, चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनद आदी धरणांमधूनही गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा आला. यामुळे काल रात्रीच धरणात ९९ टक्के जलसाठा झाला होता. तर आज सकाळी धरण पूर्णपणे भरले असून यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आज सकाळी धरणाचे चार दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले असून या माध्यमातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पाटबंधारे अभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने खालील बाजूला असलेल्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच गुरांना नदीपात्रात उतारू नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे. गिरणा धरण पूर्ण भरण्याची यंदा हॅटट्रीक झाली आहे. तर, धरण बांधल्यापासून ते फुल्ल भरल्याची यंदाची अकरावी वेळ आहे. अर्थात हे धरण पहिल्यांदाच लागोपाठ तिसर्‍या वर्षी पूर्ण भरले आहे. यामुळे यावर अवलंबून असणार्‍या नागरिकांसह शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Protected Content