शिक्षकाकडे भर दिवसा घरफोडी; १.७० लाखांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव प्रतिनिधी | शिवण मशीन दुरूस्ती कामी गेलेल्या कुटुंबाचे घराच्या भर दिवसा कुलूप तोडून १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील उत्कर्ष हाउसिंग सोसायटीत उघडकीस आली आहे.

याबाबत वृत्त असे की, दिलीप पाटील (रा. उत्कर्ष हाउसिंग सोसायटी ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून एका शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान पत्नी इंदिरा दिलीप पाटील ह्या घरीच शिवण काम करत असतात. सोमवार, ५ जुलै रोजी दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास शिवण मशीन नादुरुस्त झाल्याने घराच्या दरवाजाला कुलूप लावून मुख्य गेटला कडी लावून इंदिरा पाटील या आपले पती व मुलांसोबत समवेत मशीन दुरूस्ती करण्यासाठी गेल्या होत्या. मशीनचे किरकोळ काम असल्याने ते दुरूस्ती करून लागलीच ते दुपारी ३:१५ वाजता आपल्या घरी परतले. त्यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले.

पाटील कुटुंबियांनी घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटाची पाहणी केली असता. त्यामधील ९०,००० हजार किंमतीचे ४५ ग्रॅमचे मंगल पोत, ४०,००० हजार किंमतीचे २० ग्रॅम मिनी गंठन, २०,००० हजार किंमतीचे १० ग्रॅम सोन्याचा तुकडा, १०,००० हजार किंमतीचे ५ ग्रॅमचे कानातील कर्णफुले जोड व १०,००० हजार रोख असे एकूण १,७०,००० रूपये मूल्याचा ऐवज अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे दिसून आले. त्यावर पाटील कुटुंबियांनी लागलीच शहर पोलिस स्थानक गाठून शितल दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम- ४५४, ३८० प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content