बनावट दारूचा कारखाना : प्यादा अडकला; मुख्य सूत्रधार मोकाटच !

भुसावळ, संतोष शेलोडे | गुन्हेगारीबाबत चर्चेत असणार्‍या भुसावळात बनावट दारूचा कारखाना आढळल्यानंतर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. यात विशेष करून या कारखान्याचा मालक ताब्यात आला असला तरी या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून याचा सूत्रधार कधी ताब्यात येणार ? हा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची सर्व धागे-दोरे उलगडून दाखविणारा हा आमचा विशेष वृत्तांत.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरासाठी अवैध धंदे हा फारसा नवीन विषय नाही. रेल्वेमुळे येथील गुन्हेगारांचे आंतरराज्यीय संबंध असून यातून अनेक प्रकारचे व्यवसाय शहरासह परिसरात होत असतात. पोलीस त्यांच्या परीने याला आळा घालण्याचा प्रयत्न करतात. तर बरेचसे गुन्हेगार हे टोळीयुध्दात मारले जातात. या अनुषंगाने शहरातील शिवपूर-कन्हाळा रोडवरी फर्निचर दुकानाच्या गोदामात सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आला. यात रवी ढगे याला अटक करण्यात आले असून त्याला पोलीस कोठडी देखील मिळाली आहे. ढगेच्या जबाबातून काय समोर येणार ते तर दिसेलच…मात्र या प्रकरणामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले असून याची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कारभाराबाबत आधी देखील अनेकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष करून लॉकडाऊनच्या काळात बंदी असतांनाही अनेकांनी अवैध दारू विक्री करून आपले उखळ पांढरे करून घेतल्याचे सर्वांनी पाहिले आहे. यात नावापुरतील थातूर-मातूर कारवाई करण्यात आली. तथापि, ठोस कारवाई कधीच झाली नाही. आता बनावट दारूचा कारखाना आढळला तरी यातही ठोस कामगिरी होण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे.

दारूचा विचार केला असता भुसावळसह परिसराला बनावट मद्यविक्रीचा प्रकार हा नवीन नाही. या आधी याच प्रकारातील अनेक प्रकरणे आधी देखील समोर आली आहेत. यात शहरातील एका लिकर किंगचा मध्यप्रदेशातील बनावट दारूचा कारखाना खूप गाजला होता. या प्रकरणात त्याला बराच काळ मध्ये देखील रहावे लागले होते. अर्थात, शहरातील मद्यविक्रीचे धागेदोरे हे मध्यप्रदेशाशी जुळले असल्याचे आधीच अधोरेखीत झाले आहे. शिवपूर-कन्हाळा रोडवरील देशी दारू तयार करणार्‍या कारखान्याची टिप ही नगर जिल्ह्यातून मिळाल्याची बाब ही अतिशय लक्षणीय अशीच आहे. यामुळे या रॅकेटचे राज्यातील इतर ठिकाणांसोबत कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मध्यप्रदेश जवळ असल्याने याचे आंतरराज्यीय रॅकेट आहे की काय ? याचा देखील शोध घेण्याची गरज आहे.

रवी ढगे

दरम्यान, बनावट दारूच्या कारखान्याच्या प्रकरणात जागेचा मालक रवी ढगे याला अटक करण्यात आली असली तरी तो या प्रकरणातील प्यादा असण्याची शक्यता देखील आहे. राज्यीय अथवा आंतरराज्यीय रॅकेटशी त्याचा संबंध असल्याची शक्यता आहे. यामुळे ढगे ताब्यात आल्यानंतर हे प्रकरण जर विस्मृतीत गेले तर यातील प्रमुख सूत्रधार नामनिराळा राहू शकतो. यामुळे यात सखोल चौकशी होऊन हे रॅकेट पूर्णपणे उध्वस्त करण्याची आवश्यकता आहे. तर, इतका मोठा भयंकर प्रकार राजरोसपणे सुरू असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्थानिक कार्यालय काय करतेय ? हा प्रश्‍न देखील उपस्थित होत आहे. या प्रकरणी किमान स्थानीक कार्यालयाचे लागेबांधे तपासून पाहण्याची देखील आवश्यकता आहे. असे झाल्यास या रॅकेटमधील एक नवीन आयाम समोर येऊ शकतो. तूर्तास या विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झालेय हे मात्र नक्की !

Protected Content