चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुन्या बारेला (वय २२, रा. पाटचारी, चोपडा) याला जळगाव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
घटनेची पार्श्वभूमी:
ही दुर्दैवी घटना ७ सप्टेंबर २०२४ रोजी विरवाडे शिवारात घडली होती. पीडित मुलगी आपल्या बहिणींसोबत शेतात निंदणीच्या कामासाठी गेली होती. सायंकाळी घरी परतत असताना, आरोपी अंकेश बारेला याने पीडितेचा पाठलाग केला आणि तिला बळजबरीने वाघ्या नाल्या जवळील कपाशीच्या शेतात ओढून नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिचा खून केला. शोध घेतला असता पीडितेचा मृतदेह विवस्त्र आणि रक्ताळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयीन कामकाज व पुरावे:
सदर खटल्यात सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांनी एकूण १४ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल, आरोपीची ओळखपरेड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीडितेच्या अंगावरील विर्याचे डाग तसेच आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग यांचा ‘डीएनए’ अहवाल एकमेकांशी सुसंगत आला. हा शास्त्रोक्त पुरावा न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. सरकारी वकील बागुल यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणासारखे असल्याचे सांगत फाशीची मागणी केली होती. न्यायालयाने आरोपीला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.



