Home Cities जळगाव जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या ‘सैनिक व माजी सैनिक परिवार सेवा दिवस’

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या ‘सैनिक व माजी सैनिक परिवार सेवा दिवस’

0
111


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, वीर पिता तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी ‘सैनिक, माजी सैनिक व परिवार सेवा दिवस’ अर्थात ‘सैनिक दरबार’ आयोजित करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित तक्रारींवर थेट सुनावणी घेतली जाणार आहे.

हा विशेष सेवा दिवस जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित राहणार असून, सैनिक कुटुंबांच्या विविध प्रशासकीय, जमिनीविषयक तसेच इतर समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.

जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय यंत्रणेकडून त्वरित न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्या अडचणी वेळेत मार्गी लागाव्यात, हा या सेवा दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सैनिक कुटुंबांना एकाच ठिकाणी विविध विभागांशी संवाद साधण्याची आणि आपल्या समस्या मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना मेजर डॉ. निलेश पाटील यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आजी-माजी सैनिक, वीर माता-पिता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या सेवा दिवसाला उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. तसेच सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड आणि विश्वनाथ उगले यांनीही या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

सैनिक आणि माजी सैनिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत प्रशासनाने आयोजित केलेला हा ‘सैनिक दरबार’ अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे सैनिक कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शासन आणि सैनिक परिवार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound