जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या हंगामात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे केटरिंग व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला असून, या पार्श्वभूमीवर खान्देश केटरिंग असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे सिलेंडर उपलब्धतेबाबत तातडीचे निवेदन सादर केले आहे. या समस्येमुळे हजारो कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खान्देश केटरिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लग्नसराईचा मुहूर्त सुरू असताना केटरिंग व्यवसाय पूर्णपणे कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून असतो. मात्र सध्या अचानक निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे अनेक कार्यक्रमांवर परिणाम होत आहे. जळगाव जिल्ह्यात केटरिंग व्यवसायातून सुमारे २० हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो, त्यामुळे ही समस्या गंभीर ठरत आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सध्याचा काळ हा व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पुढील दोन महिन्यांनंतर लग्नसराईचा हंगाम संपणार आहे. त्यानंतर पुन्हा चार महिने व्यवसाय ठप्प राहतो. अशा परिस्थितीत सध्याच्या हंगामातच जर गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला, तर केटरिंग व्यावसायिकांसह कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
असोसिएशनने प्रशासनाला विनंती केली आहे की, पूर्ण पुरवठा शक्य नसला तरी किमान काही प्रमाणात तरी कमर्शियल गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, ज्यामुळे व्यवसाय काही प्रमाणात सुरू राहू शकेल. यामुळे हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर होणारा परिणाम कमी करता येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत केटरिंग व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अनेकांनी बुकिंग घेतलेल्या कार्यक्रमांचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. ग्राहकांनाही याचा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.



