भीषण अपघातात ट्रक चालकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या आणि जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या दोन ट्रकांमध्ये आज, मंगळवारी २४ जून रोजी सकाळी ८.३० वाजता दूरदर्शन टॉवरसमोर भीषण समोरासमोर धडक झाली. या अपघातात सुदर्शन प्रसाद महावीर प्रसाद (वय ५७, रा. संभलपूर, उडीसा) या ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, उडीसा येथील सुदर्शन प्रसाद महावीर प्रसाद (ट्रक क्र. ओडी १५, सी २९६३) हे कोळसा घेऊन भुसावळकडून गुजरातकडे जात होते. तर, जळगावकडून (ट्रक क्र. आरजे १४, जीटी ०४२१) क्रमांकाचा एक ट्रक भुसावळकडे जात होता. महामार्गावरील दूरदर्शन टॉवरसमोर एका ट्रकला ओव्हरटेक करताना समोरील ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे चालक सुदर्शन प्रसाद महावीर प्रसाद यांच्या छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून सुमारे तासाभरात वाहतूक सुरळीत केली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुदर्शन प्रसाद महावीर प्रसाद यांच्यासह धडक देणाऱ्या वाहनातील जखमी चालकाला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सुदर्शन प्रसाद यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अफजल बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.