जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि उत्कृष्ट क्रीडापटूंना दरवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांतर्गत खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंसाठी विशेष पुरस्कार, साहसी उपक्रमासाठी पुरस्कार, तसेच ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शकांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार देखील देण्यात येतो.

2023-24 या वर्षासाठी या पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रमात सहभागी व्यक्ती आणि दिव्यांग खेळाडूंनी आपले अर्ज 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.
अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://sports.maharashtra.gov.in) भेट द्यावी. संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंकद्वारे उपलब्ध अर्ज भरून तो 26 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. फक्त ऑनलाईन अर्ज प्रक्रियेलाच मान्यता देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.