दोन शोरूममध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; तोडफोड करून लाखोंचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात दोन वाहन शोरूममध्ये अज्ञात चोरट्यांनी शिरकाव करून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि चोरीचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. मात्र, लाखोंच्या नुकसानीच्या बदल्यात चोरट्यांच्या हाती केवळ १० ते ११ हजार रुपये लागले. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पहिली घटना : चौधरी टोयोटा शोरूम
जळगाव-भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यासमोर चौधरी टोयोटा या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये चोरट्यांनी मध्यरात्री प्रवेश केला. शोरूमच्या डिलिव्हरी सेक्शनमधील दरवाजा तोडून आत घुसलेल्या चोरट्यांनी दोन तास शोधाशोध केली. मात्र, शोरूममध्ये मोठी रोकड नसल्याने त्यांना फक्त १० ते ११ हजार रुपये मिळाले. चोरीपेक्षा मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने शोरूमचे मोठे नुकसान झाले. लॉकर, ड्रॉवर, कॅबिनेट आणि इतर वस्तूंची नासधूस करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरटे रात्री १२ वाजता शोरूममध्ये शिरले आणि पहाटे २ वाजता बाहेर पडले.

दुसरी घटना : सातपुडा ऑटोमोबाईलमध्ये चोरीचा प्रयत्न
चौधरी टोयोटामधून काही हाती न लागल्याने चोरटे नंतर सातपुडा ऑटोमोबाईलमध्ये दाखल झाले. येथेही चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. मात्र, तोडफोड करत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले. चोरट्यांनी येथे तब्बल चार तास धुमाकूळ घातला. ते पहाटे चार वाजेपर्यंत शोरूममध्ये होते आणि हा संपूर्ण प्रकारही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पोलीस तपास सुरू
या दुहेरी चोरीच्या घटनेनंतर शहरातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. शहरातील व्यापारी वर्गात या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज असून, व्यापाऱ्यांनीही त्यांच्या दुकान आणि शोरूमसाठी अधिक मजबूत सुरक्षा यंत्रणा बसवावी, असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.

Protected Content