भेंडवळच्या मांडणीचे निष्कर्ष जाहीर; जाणून घ्या सर्व भाकिते ( व्हिडीओ )

बुलढाणा, अमोल सराफ । महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यांमधील शेतकर्‍यांचे लक्ष लागून असणार्‍या भेंडवळ येथील घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यंदा देखील कोरोनामुळे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत घट मांडणी करण्यात आली. यात पावसाळा समाधानकारक राहणार असून अवकाळी पाऊस येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर, रोगराईचे सावट व आर्थिक अरिष्टाचेही भाकीत करण्यात आले आहे.

प्रसिद्ध असणार्‍या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. या भेंडवळच्या भाकिताकडे राज्यभरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून असतं. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला ३५० वर्षांची परंपरा आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढला आहे. त्यामुळे याहीवर्षी बुलडाण्यातील ही प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी शासनाच्या निर्बंधामुळे पारिवारिक पूजा करुन घरातूनच करण्यात येणार असल्याची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आता या घट मांडणीतून सांगण्यात आलेले निष्कर्ष पुढे आले आहेत.

ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून विविध शेतकरी येतात. अक्षय्य तृतीयेच्या दुर्‍या दिवशी हे भाकित सांगितलं जातं. ३५० वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे.

भेंडवळच्या घट मांडणीत केलेली काही महत्त्वाची भाकितं पुढीलप्रमाणे-

या भाकितानुसार यावर्षी जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात होणार असून, ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात दिलासा मिळेल. या भाकितामध्ये अशी देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल. देशाच्या राजाची गादी कायम राहणार असून मात्र राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल असं भेंडवळच्या घट मांडणीत सांगण्यात आलं आहे. देशाच्या प्रधानावर ही संकट आहे असं भाकित या घट मांडणीत व्यक्त करण्यात आलं आहे. शिवाय देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव आणि ताण राहणार असून घुसखोरीचा प्रभाव जास्त शेतकर्‍यांसाठी संंमिश्र भाकित या घट मांडणीत करण्यात आलं आहे. यावर्षी कापूस ,ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे. मात्र तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण या पिकांना भाव राहणार नाही.

सर्वात महत्वाचं म्हणजे या भाकिताकडे ज्या बाबतीत सर्वांचं लक्ष होत ते म्हणजे यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार आहे. कोरोना सारख्या महामारीतून दिलासा मिळण्याचं यावर्षभरात तरी शक्यता नाहीये. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज भेंडवळची घट मांडणीच भाकित जाहीर केलं आहे, यावर्षीही देशावर रोगराईचे संकट मोठ्या प्रमाणावर आहे तर आर्थिक टंचाई सुद्धा भासेल अशी माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी दिली आहे.

Protected Content