जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरी करणे, दहशत निर्माण करणे, शस्त्र हातात बाळगत लोकांना धमकविणाऱ्या रेकॉर्डवरील रवंज येथील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी रविवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दिलेल्या प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे. नाना उर्फ बुधा उत्तम कोळी (वय-३२) रा. रवंजे ता.एरंडोल असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे राहणारा गुन्हेगार नाना उर्फ बुधा उत्तम कोळी हा बेकायदेशीररित्या हातात शस्त्र बाळगणे, शस्त्राने इतरांना धमकाविणे, चोरी करणे, मारहाण करणे शिवाय इतर प्रकारचे गुन्हे केल्याप्रकरणी त्याच्यावर एरंडोल, धरणगाव आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकूण १० वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर एरंडोल पोलिसांनी चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची सुधारणा होत नसल्याचे लक्षात आले. त्यानुसार एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा अहवाल तयार करून तो अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याकडे रवाना केला. त्यानुसार पोलीस अधीक्षक यांनी अहवालाचे अवलोकन करून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकारी यांनी २४ नोव्हेंबर रोजी स्थानबद्ध करण्याचे आदेशाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार गुन्हेगार नाना उर्फ बुधा उत्तम कोळी याला पुण्यातील येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, विकास देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील, अनिल पाटील, पोलीस नाईक अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, प्रशांत पाटील, पंकज पाटील यांनी गुन्हेगाराला ताब्यात घेत. त्याला येरवडा येथील कारागृहात स्थानबद्ध केले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी रविवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दिलेल्या प्रसिद्धीपत्रकांन्वये कळविले आहे.