तालखेडा येथे ‘सृजन-२’ शिबीर उत्साहात

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज | नागपूर येथील ’श्री.रुद्र वेलफेअर फाऊंडेशन’ व ’मानवता सेवा संस्था’ तालखेडा यांच्या वतीने घेण्यात येणारे ‘सृजन-२’ हे पाच दिवसीय निवासी शिबीर नुकतेच ’मानवता फार्म’ तालखेडा येथे उत्साहात पार पडले.

’ग्रामीण भागातील क्षमतासंपन्न,होतकरू व गरजू कुमारवयीन मुला-मुलींसाठी समृद्ध अनुभव आणि संधींची रचना करून त्यांना अर्थपूर्ण तारुण्याकडे घेऊन जाणार्‍या नियोजनबद्ध कृती कार्यक्रमाचे नाव आहे ’सृजन. !

महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांतून आलेल्या नोंदणी अर्जांची तपासणी करून व प्रत्येक अर्जदाराची मुलाखत घेऊन अंतिम ७५ अर्जदार मुला-मुलींची शिबीरार्थी म्हणून निवड करण्यात आली. पाच दिवसांच्या निवासी शिबिरात स्व-जाणीव,न्याय,समानता,वैज्ञानिक दृष्टिकोन,संवेदनशीलता,समानानुभूती, निसर्ग प्रेम,कौटुंबिक व सामाजिक जाणिव,संघभावना,चिकित्सक विचार,समस्या निराकरण,सर्वधर्म समभाव,सकारात्मकता,आत्मविश्वास, मानवीयता आदी मूल्यांना घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध गटकार्ये,कृतीयुक्त गीते,खेळ,जंगल सफारी,आदिवासी गावांना भेटी,अवकाश निरिक्षण घेण्यात आले.

शिक्षण,करिअर निवड,कुमारवयीन मुला-मुलींचे शारीरिक,भावनिक, मानसिक व सामाजिक आरोग्य,वाचन संस्कृती,आपल्या व विश्वाच्या निर्मितीची कथा,मोबाईल व सायबर विश्व आणि कुमारवयीन मुलं,आपला आहार व आरोग्य,आत्महत्या,संवाद कौशल्ये,आर्थिक नियोजन,सुलेखन आदी विषयांवर बौध्दिक सत्रं घेण्यात आले. यासोबतच डायरी लेखन,पत्रलेखन,श्रमकार्ये,सर्वधर्म प्रार्थना,योगासने व व्यायाम हे पण घेण्यात आले.
जंगल सफारीत सातपुड्यात एका वाहत्या ओढ्यावर वनराई बंधारा निर्माण करण्यात आला.आदिवासी गावांत फराळ वाटप करण्यात आले व पथनाट्ये सादर केल्या गेलीत.

कुमारवयीन मुलांचा सर्वांगिण विकास करणार्‍या व त्यानंतर ’सपोर्ट सिस्टीम’ म्हणून काम करणार्‍या ’सृजन’ उपक्रमास परिसरातील व दूरवरच्या दानशूर व्यक्तींनी विश्वास ठेवून सर्व प्रकारचे सहकार्य केले. शेवटच्या दिवशी सर्व शिबीरार्थ्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यासाठी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव (ऊखएढ) चे प्राचार्य डॉ.श्री.अनिल झोपे यांनी या सत्राला संबोधित केले.

शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सर्व ’सृजन टीम’ मधील अजय बत्तुलवार,शशिकांत माळी, प्रविण पाटील, श्यामकांत बागुल, अलका पावनगडकर, वसुधा जोशी,सचिन पाटील,लिलाधर पाटील, प्रमोद बारी, गणेश ढेंगे, संदीप गोंधळी, मंगेश नंदा काशिनाथ,मनिषा सोनवणे, ज्योतीका ताटीकोंडा,भाग्यश्री ढेंगे, स्वाती महानंदा सुरेश,दिक्षा इंगळे,वैष्णवी ससे,मिनाक्षी पाटील, मनिषा ढेंगे, अतिष चौधरी,भुमेश्वर तटीकोंडा,योगेश जवंजाळ,रवी हिरोळे,प्रशांत ढेंगे,प्रशांत बावस्कार,विनोद सोनवणे,राजू सोनवणे,श्याम वासनिक यांनी खूप मेहनत घेतली.सर्व पालकांनी सहकार्य केले तसेच ग्रामीण भागात कुमारवयीन मुलांसाठी नियोजनबद्धरीत्या व अभ्यासपूर्ण कार्य करणार्‍या ’सृजन’ उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.

Protected Content