कोरोना इफेक्ट : शैक्षणिक वर्षासाठीच्या शुल्क वाढीला विद्यापीठाची स्थगिती

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे झालेली आर्थिक मंदी लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नवीन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू करण्यात आलेल्या शुल्क वाढीला या शैक्षणिक वर्षासाठी स्थगिती दिली आहे.

गतवर्षी जून २०१९ मध्ये व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिकवणी शुल्क व इतर शुल्क वाढीबाबत चर्चा झाली होती. मात्र गतवर्षी खान्देशातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेवून शैक्षणिक वर्ष २०१९-२० ऐवजी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून नवी शुल्कवाढ लागू करण्याचा ठराव पारीत करण्यात आला होता. तसे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना शुल्कवाढीबाबत कळविले होते. मात्र सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी लक्षात घेवून खान्देशातील विद्यार्थ्यांवर नव्या शैक्षणिक वर्षात आर्थिक ओझे पडू नये यासाठी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी विविध प्राधिकरणाच्या सदस्यांसमवेत चर्चा करून या शुल्कवाढीला शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये स्थगिती दिली आहे. सर्व महाविद्यालये / परिसंस्था यांच्या प्राचार्य व संचालकांना आणि विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळांना याबाबत कळविण्यात आले असून शुल्कवाढ आकारण्यात येवू नये असे सांगितले आहे. अशी माहिती प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर यांनी दिली.

Protected Content