ब्रेकींग : एकनाथराव खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्‍चीत

मुंबई । भाजपचे मातब्बर नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश अखेर निश्‍चीत झाला असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. खडसे यांच्याकडे पक्षातर्फे मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

न्यूज-१८ लोकमत या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार भाजपचे बलाढ्य नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्‍चित झाला असून याची औपचारीक घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष मोठी जबाबदारी टाकणार असल्याचा दावा देखील या वृत्तात करण्यात आला आहे.

भाजपचे मातब्बर नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. २०१६ साली लागोपाठ काही दिवसांमध्ये आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर पक्षाने त्यांचे पुनर्वसन तर केले नाहीच, पक्ष सातत्याने त्यांची उपेक्षा केली. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकिट नाकारून त्यांच्या मुलीस तिकिट देण्यात आले. मात्र त्यांच्या पराभव झाल्याने खडसे संतप्त झाले असून त्यांनी सातत्याने पक्षावर टीका केली होती.

अलीकडच्या सुमारे दोन महिन्यांपासून एकनाथराव खडसे हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. काही दिवसांपूर्वी यासाठी शरद पवार यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील नेत्यांचे मत जाणून घेतले होते. यानंतर त्यांना शिवसेनेनेही ऑफर दिल्याची चर्चा होती. अर्थात, खडसे हे पक्ष बदलणार…मात्र ते नेमके कुठे जाणार याबाबतची माहिती समोर आली नाही. आता मात्र ते हातावर घड्याळ बांधणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्‍वभूमिवर, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश निश्‍चीत झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content