मोदींनी अदानीला दिली ५० कंत्राटे : राहुल गांधी यांचा आरोप

rahul gandhi

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | “गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानीला ५० कंत्राटे दिली. विमानतळे आणि बंदरांची एक लाख कोटींहून अधिक कामे दिली. काही दिवसांपूर्वीच अवघ्या १५ ते २० लोकांचे एक लाख ४० हजार कोटींचे कर्ज माफ केले. ही चोरी आणि भ्रष्टाचार नाही तर काय आहे,” असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर केला.

 

सुधारीत नागरिकत्व कायदा, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात काँग्रेसतर्फे येथील रामलीला मैदानावर ‘भारत बचाव’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अर्थव्यवस्थेच्या मुदद्यावरून राहुल यांनी सरकारवर हल्ला चढवला. ‘रेप इन इंडिया’ म्हटल्याबद्दल भाजपवाले माझ्याकडून माफीची मागणी करत आहेत. पण माफी मोदी आणि त्यांचे आसिस्टंट अमित शहा यांनी मागितली पाहिजे. या दोघांनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली. देशात अर्थव्यवस्था होती, आता नाही. त्यांना स्वीस बँकेतून पैसे आणायचे नव्हते आणि काळ्या पैशांविरोधातही लढायचे नव्हते. त्यांना फक्त गरिबांच्या खिशातला पैसा काढून अदानी-अंबानीला द्यायचा होता. तेच त्यांनी केले,’ असेही राहुल गांधी म्हणाले.

Protected Content