ओमायक्रॉनसाठी कोविशिल्डचा ‘बुस्टर डोस’ ? : जाणून घ्या पुनावालांचे मत !

पुणे प्रतिनिधी | एकीकडे कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटमुळे केंद्र व राज्य सरकारे सतर्क झालेली असतांना या व्हेरियंटसाठी कोविशिल्ड या लसीचा ‘बुस्टर डोस’ येणार का ? या महत्वाच्या प्रश्‍नाबाबत सिरम इन्स्टीट्युटचे अध्यक्ष आदर पुनावाला यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

ओमायक्रॉनमुळे वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतात कोविशील्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पूनावाला यांनीही आपले मत मांडले आहे. पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज भासल्यास नवीन करोना प्रकारासाठी खास बनवलेली कोविशील्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. कोविडशील्ड लस नवीन प्रकाराविरूद्ध किती प्रभावी आहे हे येत्या २-३ आठवड्यांत कळेल. अशा परिस्थितीत, आवश्यक असल्यास, ओमिक्रॉन लक्षात ठेवून बूस्टर डोस देखील शक्य आहे.

एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुनावाला म्हणाले की, ऑक्सफर्डमधील संशोधक यावर काम करत आहेत. या संशोधनावर आधारित आम्ही नवी लस बनवू, ती बुस्टर डोस म्हणून काम करू शकेल. याचे किती डोस घ्यावे लागतील हेही नंतरच सांगता येईल. लान्सेटने कोव्हिशिल्डची परिणामकारकता फार चांगली असल्याचं म्हटलं आहे. या व्हॅक्सिनमुळे रुग्णालयात भरती होण्याची फारशी वेळ येत नाही. कोव्हिशिल्डची परिणामकारकता कमी होईल असे काही नाही.

दरम्यान, पुनावाला पुढे म्हणाले की, जर बुस्टर डोसची गरज पडली तरी कंपनीकडे पुरेसे डोस उपलब्ध आहेत, आणि ते जुन्याच किंमतीत दिले जातील. जवळपास २०० दशलक्ष इतके डोस भारतासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. जर केंद्राने बुस्टर डोसचा निर्णय घेतला तर आमच्याकडे पुरेसा साठा आहे. सध्या तरी ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना लस मिळावी हे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.

Protected Content