बनावट टिआरपीचे रॅकेट उद्ध्वस्त; रिपब्लीक टिव्ही देखील गोत्यात

मुंबई । आपल्या चॅनलला लोकप्रिय दाखविण्यासाठी बनावट टिआरपीचा वापर करणार्‍या दोन चॅनलच्या मालकांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून यात रिपब्लीक टिव्ही ही वाहिनी देखील गोत्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिरसिंग यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला. यात त्यांनी मुंबई पोलिसांनी बनावट टिआरपीचे रॅकेट उदध्वस्त केल्याचा दावा केला. यानुसार टिआरपीची गणना करण्यासाठीचे काही पॅरामिटर निश्‍चित करण्यात आले आहे. यासाठी हंसा हा ख्यातनाम कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीतील काही आजी-माजी कर्मचार्‍यांना हाताशी धरून मुंबईत टिआरपीची गणना करण्यासाठी निश्‍चीत करण्यात आलेल्या घरांमधील लोकांशी संपर्क करण्यात आला. या नागरिकांना दरमहा चार-पाचशे रूपयांच्या माध्यमातून दिवसभर विशिष्ट चॅनल्स सुरू करण्याचे सांगण्यात आले. परिणामी संबंधीत चॅनलची टिआरपी रेटींग ही आपोआप वाढल्याचे दिसून आले.

मुंबई पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून कसून चौकशी केल्यानंतर यात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन वृत्तवाहिन्या बनावट टिआरपीचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासोबत यात रिपब्लीक टिव्ही या इंग्रजी वाहिनीचा समावेश देखील असल्याचे दिसून आले आहे. फक्त मराठी व बॉक्स सिनेमा या वाहिनीच्या मालकांना अटक करण्यात आली असून रिपब्लीकचे संचालकही गोत्यात आले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.