आयपीएल सट्ट्यावर एलसीबीची धाड; दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी ।  सध्या आयपीएल क्रिकेटचे सामने सुरू आहे. सामना सुरू असतांना ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री कारवाई करत शिवकॉलनीतून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील १० मोबाईलसह १ लाख २७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,  शिव कॉलनीतील गंगासागर अपार्टमेंटच्या तळमजल्यावर योगेश प्रदीप महाजन (२६, रा.गंगासागर अपार्टमेंट, शिव कॉलनी) याच्या घरात केकेआर विरुध्द सीएसके या आयपीएल क्रिकेट मॅचवर मोबाईलवर ऑनलाईन सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी रात्री ८.४५ नऊ वाजता गंगासागर इमारतीला घेरुन योगेश महाजन याच्या घराच्या बाहेर दबा धरला. सट्टा घेत असल्याची खात्री पटताच पथकाने धाड टाकून योगेश महाजन व राजेंद्र श्रीराम पाटील (३९, रा.गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा) या दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांनी गुन्ह्याची कबुलीही दिली. त्यांच्याकडून टीव्ही, सेटटॉप बॉक्स, रिमोट, पेनड्राईव्ह, लॅपटाप व १० मोबाईल असा १ लाख २७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी सपोनि स्वप्नील नाईक, उपनिरीक्षक अंगद नेमाणे, विजयसिंग पाटील, अनिल जाधव, गोरखनाथ पाटील, महेश महाजन, दत्तात्रय बडगुजर, राहूल पाटील, अविनाश देवरे, सविता परदेशी व रमेश जाधव यांचे पथक रवाना केले.

Protected Content