बोदवड, प्रतिनिधी| राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार आणि विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणात कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर भाजपा सरकारने सुडबूध्दीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करीत या करण्यात असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज बोदवड शहरात १००% बंद पाळण्यात आला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात जाणुन बुजून घेत त्यांच्यावर सरकारने सुडबूध्दीने व मनमानी कारभार चालवीत त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप यावेळी बोदवड तालुका राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. यावेळी शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बोदवड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात गर्दी केली होती.यावेळी ‘एकच वादा अजित दादा’व ‘एकच साहेब पवार साहेब’अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला. याबाबत संपूर्ण बाजार पेठेत फिरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्र पाटील, नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे गटनेते देवेंद्र खेवलकर, नगरसेवक जिवन पालवे व कार्यकर्त्यांनी बोदवड व्यापारी मंडळींना बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला व्यापारी मंडळींनी प्रतिसाद देत आज बोदवड शहरातील संपूर्ण दुकाने बंद ठेवून सहकार्य केले.