राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईडी कारवाई विरोधात ‘बोदवड बंद’

bodaval 1

बोदवड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडीने’ गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बोदवड येथे आज (दि.26) शहर बंद पुकारण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खा.शरद पवार आणि विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणात कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर भाजपा सरकारने सुड-बुध्दीने गुन्हा दाखल केला जात आहे. यासंदर्भात आज बोदवड शहरात बंद हाक देण्यात आली असून व्यापारी मंडळींसह नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात जाणिवपुर्वक घेत असून त्यांच्यावर सरकारने सुडबूध्दीने आणि मनमानी कारभारामुळे (ED)ईडीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप तालुका राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला आहे. यावेळी शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बोदवड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात गर्दी केली होती. यावेळी ‘एकच वादा अजित दादा’ व ‘एकच साहेब पवार साहेब’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

याबाबत काल संपूर्ण बाजार पेठेत फिरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्र पाटील, नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे गटनेते देवेंद्र खेवलकर, नगरसेवक जिवन पालवे व कार्यकर्त्यांनी बोदवड व्यापारी मंडळींना बंद ठेवण्याचे आव्हान केले. या आव्हानाला व्यापारी मंडळींनी प्रतिसाद देत आज बोदवड शहरातील संपूर्ण दुकाने बंद ठेवून सहकार्य केले आहे.

Protected Content