तारुण्याच वास्तव ( ब्लॉग )

youth

प्रत्येक माणूस या तारुण्याच्या वळणावर उभा असतो तिथून त्याला सार जग स्वतः च्या मुठीत घेता यावं अशी महत्वाकांक्षा असते. तीच त्याच्या तारुण्याचा बुरुज बांधत असते, मजबूत व्यक्तिमत्त्व घडवत असते. आणि हेच व्यक्तिमत्त्व पुढे कुटुंब, गाव, आणि देश घडवत, म्हणूनच तरुणांना देशाची खरी संपत्ती म्हटल जातं.

देशातला तरुण जर बौद्धिक आणि वैचारिक पातळीने उंच असेल, त्याची मानसिकता सामाजाभिमुख असेल तर त्या देशाची प्रगती कुणीच रोखू शकत नाही. तारुण्य प्रत्येक माणसाला हवस वाटणार ते कधीही कमी होऊ नये, आयुष्य तिथेच थांबावं अश्या अनेक कल्पना असलेलं, हे सुंदर आणि काटेरी वळण असतं। या नाजूक वळणावर आपण योग्य निर्णय घेऊन भक्कमपणे उभं राहावं म्हणूनच आपल्यावर चांगले संस्कार केले जातात त्यातून माणूस चांगलं वाईट यातला फरक शिकतो, तो संवेदनशील असून त्याच्या वैचारिक क्षमतेने भावनिक गर्तेतून बाहेर पडतो. आजवरच्या इतिहासात जर शोध घेतला तर दिसून येत, या भारतीय संस्कृती ने जगाला खर सुख आणि समाधान मनाच्या वृत्तीवर ठरलेलं आहे हे निक्षून सांगितलंय आणि सिद्ध ही केलय. भारतीय अध्यात्माने जगाला मार्गदर्शन केले आहे. मग ते चारही वेद असतील, मनाचे श्‍लोक असतील, पसायदान असेल, ध्यान साधना असेल असे अनेक पर्याय आहेत. मानवी आयुष्य स्थिर करण्याचे, आणि या गोष्टींपासून आजचा तरुण दूर पळतोय जर तुमची मुळे च घट्ट नसतील तर कितीही उंची गाठुन ते आत्मिक सुख मात्र तुमच्या पासून लांब राहील. पाश्‍चिमात्य फक्त वासना आणि शरीर सुख यात जास्त रमलेले दिसतात. त्यांना आत्मिक समाधान आणि मानसिक सुख याचा गंध कमीच, म्हणून त्यांनी आपलं अध्यत्म आणि संस्कृती अभ्यासायला सुरवात केली. मात्र आजच्या भारतीय तरुण पिढीने याच अध्यात्माला दुर्लक्षित केल्याच चित्र दिसत आहे.

भोगापासून परावृत्त करून योगाने परम सुखाकडे नेणारी आपली परंपरा सार्‍या जगाने गौरवली, स्वीकारली आणि अंगीकारली सुद्धा ! आपले ज्ञानेश्‍वर महाराज वयाच्या १६ व्या वर्षी जगातलं सर्वोत्तम ज्ञान आणि जगण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्‍वरीत लिहून गेलेत. आणि आज आमची १६ वर्ष अशीच शाळेत बडबडण्यात, शिक्षकांना हिणवण्यात आणि माय बापानी हाती दिलेल्या त्या मोबाईल मध्ये अक्षरशः बरबाद होताय.लहान मुलांना मातृभाषा सुध्दा धड बोलता येत नाही. कारण आपण त्यांना आधीच इंग्रजीच बाळकडु देतोय. काळाची गरज म्हणून शिकवली तर वाईट नाही. परंतु तिलाच डोक्यावर घेऊन, आपली अस्मिता व अस्तित्व कमी करण हा निर्लज्जपणा म्हणावा लागेल. आणि हाच निर्लज्जपणा आजचा तरूण करतोय.

एका अर्थी तारूण्य म्हणजे सळसळत रक्त, मनगटात ताकद, मनात जिद्द आणि विचारात आग असते. जग पालथं घालण्याची हिम्मत असत., हे फक्त शब्द नाहीत आपल्या समोर अशी अनेक सत्य उदाहरणे आहेत , मग ते विवेकानंद आहेत शाहिद भगतसिंग आणि आझाद असतील. वीरांगना प्रीतीलता आणि सुनीती असतील अशी अनेक माणसं सापडतील इतिहास नीट वाचला तर. यांच्या बद्दल सांगण्याचं करण इतकंच की, आपण ठरवलं तर आजही देशा साठी करायला काही तरी सापडेल फक्त इच्छा असावी तशी! आणि नाहीच ते जमल तर निदान चुकीच्या गोष्टी करून, या मानावं जातीला लाजवतील अशी कृत्य करून आपल्या पुढच्या पिढीला आपण धोका निर्माण करतोय.

आजचा तरुण आयुष्याला जरी महत्व देतो तरी तारुण्य म्हणजे फक्त एक मौज आणि रंगीबेरंगी जग समजतो. मनाच्या तालावर नाचणारे कारंजे आणि अनेक प्रलोभनांना तो बळी पडतो, आणि आयुष्याच गणित इथेच बिघडतं. आणि हेच होऊ नये म्हणून आपल्या आयुष्याला कुठेतरी दैवी शक्ती चा आधार आहे ज्याला आज विज्ञान सुद्धा मान्य करतंय. भीती ने घाबरून गेलेला, आयुष्याला वैतागलेला माणूस जेव्हा स्वतःमधला आणि ईश्‍वरावरचा हा विश्‍वास पुन्हा जागवतो तेव्हा त्याला नवीन उमेद मिळते जगण्याची. आणि प्रत्येक माणसात देव आहे असं सांगणारी आपली संस्कृती देशात सलोखा आणि सहिष्णुता जपण्याचा अनेक वर्षे प्रयत्न करते आहे. वाहत राहणं हा जीवनाचा गुणधर्म आहे पण माणसाने स्वतःला त्या प्रवाहात सामावुन घेण्या योग्य घडवाव हे त्याचं पाहिलं कर्तव्य म्हणावं लागेल.

आजचा तरूण आनंद आणि मौजमस्ती यातला फरकच ओळखत नाही. त्याला नशेच्या बाटलीत आपला आनंद वाटतो जो क्षणभंगुर असतो. सत्त्यापासून आयुष्याला दूर नेतो. काही वेळ आकाशात फिरून आल्याचा भास होतो आणि मग तो निराशेच्या खाईत लोटला जातो. मार्ग बंद झालेले दिसतात आणि आत्महत्या असा चुकीचा पर्याय ती किंवा तो निवडतो. माणसाला पडलेले प्रश्‍न सोडवायला खूप पर्याय असतात फक्त गरज असते आपण ते न थकता शोधून काढण्याची. यात कुठलाही शेवटचा पर्याय आत्महत्या हा नसतोच. तो आपण स्विकारतो, आयुष्य संपत, पण ज्या कारणांनी संपलं ते अजूनही तसच असत म्हणजे प्रश्‍न आपल्या आत्महत्या केल्याने सुटणारा नसतो. याचा अर्थ आपण विनाकारण हा टोकाचा निर्णय घेतोय.

आणि आजचा तरुण इतका कसा भित्रा आणि बेजबाबदार असू शकतो, की फक्त कुणाच्या काही शब्दांमुळे किंवा काही कमी मार्कामुळे आयुष्य मातीमोल करतो. आज मायबाप हक्काने रागावू शकत नाही कारण त्यांना भीती वाटते आपलं पोरगं काहीतरी भलतंच करून बसेल, आपल्याच लोकांमध्ये राहून आपण मनातलं का बोलू शकत नाही. एकदा प्रयत्न तरी करावा पण आत्महत्या हा पर्याय म्हणजे कलंक ठरतो आपल्या नावावर. आपल्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे समाजाची ती तुम्ही समाजसेवक नाही झालात तरी संभाळता येते. त्या साठी कुठल्या ही परिस्थिती पुढे हतबल न होता तिला झुकवून पुढे जाण्याची वाट निर्माण करावी,तुमचा एक आदर्श अनेकांना प्रेरणा देतो आणि ही सुद्धा देश सेवाच आहे.

हेमलता चौधरी

Protected Content