बसस्थानकात आजींनी असं काही केलं की; सर्व पाहतच राहिलेत…

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाजात घडणाऱ्या गोष्टींचा प्रभाव सर्वसामान्यांच्या जीवनावर पडत असतो. प्रत्येकवेळी ते व्यक्त होताच असं  नाही. किंबहुना; त्यांची दखल घेतलीच जाईल असे होत नाही. मात्र जळगाव बस बसस्थानकात सर्वसामान्य आजींनी असं काही केलं की की सर्व पाहतच राहिलेत. त्यांची दखलही घेतली गेली आणि त्यांची कृती मनाला स्पर्शूनही गेली.

नेमकं झालं असं की,नेरी जवळील एका खेडेगावातून आजी लगबगीने शहराकडे येण्यासाठी निघाल्या. योग होता शहरात रहात असलेल्या मुलाला व नातवंडांना भेटण्याचा… भल्या सकाळी आजीने सर्व सामान भरला विशेष म्हणजे नातू नातण्यासाठी घरच्या घरी पेढे तयार केले होते तेदेखील सोबतीला घेतले आणि शहराकडे येण्यासाठी वाहनाची वाट पाहत रस्त्यावर उभ्या राहिल्या.

अनेक वाहने आली आणि गेली परंतु प्रत्येक वाहनात ठासून प्रवासी असल्यामुळे आजींना बसायला जागाच मिळाली नाही. थोड्याच वेळात अचानक रस्त्याने लालपरी येताना दिसली आणि आजीच्या हृदयाचा ठोका चुकला.. गेले कित्येक दिवसांपासून संप सुरू असल्यामुळे लाल परी रस्त्यावर दिसतच नव्हती. परंतु काही प्रमाणात वाहतूक सुरू झाल्यामुळे एसटी बसेस रस्त्यावर धाऊ लागलेल्या आहेत आजींनी लालपरीस हात दिला. एसटी चालकाने विनम्रपणे गाडी थांबवून आजीला गाडीत घेतले. आजीला फार बरे वाटले. संपूर्ण प्रवासात आजींनी एसटी कंडक्टर व प्रवाशांजवळ एसटीचे भरभरून कौतुक केले.

थोड्या वेळात बस जळगाव बस स्थानकावर पोहोचली. तेथे अनेक लाल पऱ्या उभ्या असल्याने आजींच्या आनंद द्विगुणित झाला. आजींनी बस स्थानकात फेरफटका मारून नियंत्रण कक्षजवळ ठिया मारला आणि आपली पिशवी उघडून सर्व एसटी कर्मचाऱ्यांना पेढे वाटायला सुरुवात केली. “आपला लालपरीले अशीच सुरू ठेव जात रे भाऊ.. हिना शिवाय कोनालेच करमत नही, सरकारले बी समजाले पाहिजे, तुमी कितला मेहनत करतस भाऊस होनं” असं म्हणत नातूसाठी आणलेले सर्व पेढे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात सर्व एसटी कर्मचारी व प्रवाशांना वाटून आजीबाई मोकळ्या झाल्या.”

ही बातमी बस स्थानकावरील अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी आजीबाईकडे धाव घेतली आणि त्या आजींची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या ‘लालपरी’वरील प्रेमाचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी जळगाव आगाराचे स्थानक प्रमुख मनोज तिवारी, वाहतूक निरीक्षक सोनटक्के, युनियन पदाधिकारी गोपाल पाटील व बाप्पू हटकर उपस्थित होते.

भावना अनावर झाल्या कि सर्वसामान्य माणसांना भरून येतं. आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून संत तुकाराम महाराज यांच्या ‘अवघे विश्वची माझे घर’ या उक्तीशी नातं सांगणारी आजीबाईची हि कृती, पुटपुटत्या ओठांनी दिलेले आशीर्वाद आणि लालपरीविषयीची कृतज्ञता नक्कीच उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेली.

Protected Content