पीडितेने केलेल्या आरोपांची जरूर चौकशी करा : चित्रा वाघ

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । अत्याचार झालेल्या पिडीतेने केलेल्या आरोपांची राज्य सरकारने जरूर चौकशी करावी, कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत, असे आव्हान भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.

श्रीमती चित्रा वाघ यांनी यावेळी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला. त्यांनी सांगितले की, १६ फेब्रुवारी रोजी सदर तरुणीने मला दूरध्वनी केला. त्यावेळी मी राज्याबाहेर होते. राज्यात परतल्यानंतर २-३ दिवसांनी पुण्यात पीडित तरुणीची माझी भेट झाली. सदर तरुणीने मला तिच्यावर २०१७ पासून झालेल्या अत्याचारांची कथा सांगितली. त्या पीडितेने तिच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात झालेल्या उपचारांबाबतची माहितीही कागदपत्रांसह मला दिली. हे पुरावे पाहून मी त्या तरुणीसाठी लढण्याचे ठरवले. पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राज्याच्या गृहमंत्र्यांनाही या तरुणीवरील अत्याचारांची माहिती कळवली. ती तरुणी एकटी लढते आहे, आपण तिला साथ दिली पाहिजे, या भावनेने मी तिच्यासाठी लढण्याचे ठरवले. मुंबईत पत्रकारांपुढे त्या पीडितेला आणून तिची कहाणी ऐकवायला लावली. हे करताना एका महिलेला न्याय देण्याची माझी भूमिका होती. ही माझी चूक असेल तर ती मला कबूल आहे.

सदर तरुणीने कोणकोणते संदेश मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पाठवले याची माहितीही श्रीमती वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या की, आता पीडितेने कोणत्या हेतूने माझ्यावर आरोप केले आहेत, हे मला ठाऊक नाही. ज्यावेळी ही तरुणी न्याय मागत होती. त्यावेळी तिच्या मदतीस कोणीही आले नाही. आता तिने माझ्यावर आरोप केल्यानंतर सर्वजण माझ्या विरोधात पीडितेच्या बाजूने बोलत आहेत. या आरोपांबद्दल मी पीडितेला दोष देणार नाही. पीडितेने आरोप केलेल्या शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक याला शिक्षा होण्यासाठी सरकारने पावले टाकावीत एवढीच आपली अपेक्षा आहे. तरुणीच्या आरोपाची राज्य सरकारने हव्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करावी.  या चौकशीतून सत्य बाहेर यावे आणि पीडितेला न्याय मिळावा अशीच आपली भावना असल्याचे चित्रा वाघ यांनी नमूद केले.

Protected Content