राम रहिमला एका दिवसाचा अत्यंत गोपनीय पॅरोल

 

चंदीगड वृत्तसंस्था । :बलात्कार आणि हत्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला गुपचूपपणे एका दिवसाची पॅरोल मंजूर करण्यात आला होता . हरियाणातील मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर सरकारनं २४ ऑक्टोबर रोजी राम रहीम याला पॅरोल दिला होता.

हा डेरा सच्चा सौदा प्रमुख रोहतक तुरुंगात बंद आहे. राम रहीम याला आजारी आईला भेटण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्या गुरुग्रामच्या एका रुग्णालयात भर्ती आहेत.

राम रहीमला पॅरोल मंजूर करताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. राम रहीमला सुनारिया तुरुंगातून गुरुग्राम रुग्णालयापर्यंत मोठ्या सुरक्षेसहीत नेण्यात आलं.

तो २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत आईसोबत होता. पोलिसांच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. एका तुकडीत ८० ते १०० जवानांचा सहभाग असतो. तैनात जवानांनाही या गोष्टीची भनक नव्हती की कोणत्या व्यक्तीला एस्कॉर्ट करत होते.

राम रहीमला पडदे लावलेल्या पोलिसांच्याच एका गाडीतून गुरुग्राम रुग्णालयापर्यंत आणण्यात आलं. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये ही गाडी पार्क करण्यात आली. ज्या मजल्यावर राम रहीमच्या आईवर उपचार सुरु होते, तो संपूर्ण मजला रिकामा करण्यात आला.

‘आम्हाला तुरुंग अधीक्षकांकडून राम रहीमच्या गुरुग्राम दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचं निवेदन मिळालं होतं. त्यामुळे २४ ऑक्टोबर रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरक्षा उपलब्ध करून दिली होती’, असं म्हणतानाच रोहतक पोलीस अधीक्षक राहुल शर्मा यांनी या बातमीला दुजोरा दिलाय.

केवळ मुख्यमंत्री आणि हरियाणाच्या काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती होती. भाजपच्या एका बड्या नेत्याच्या आदेशानंतर ही हालचाल झाली होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या पद्धतीनं एखाद्या मोठ्या गुन्ह्यातील दोषीला पॅरोल देऊन हरियाणा अधिकाऱ्यांनी भविष्यात त्याला पॅरोलवर सुटका मागण्याची सूट दिलीय.

Protected Content