जास्त सीमकार्ड वापरणार्‍यांनो सावधान…..नव्याने करावे लागेल व्हेरिफिकेशन !

मुंबई प्रतिनिधी | अनेक जणांना विविध मोबाईल क्रमांक वापरण्याचा शौक असतो. यामुळे अर्थातच त्यांच्याकडे खूप सीमकार्ड असतात. मात्र याला दूरसंचार मंत्रालय जास्त सीमकार्ड वापरणार्‍यांवर नियंत्रणासाठी नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. जाणून घ्या काय असेल नवीन नियम ?

बहुसंख्या मोबाईलधारकांकडे एकापेक्षा जास्त सीमकार्ड असतात ही बाब नवीन नाही. कारण बहुतेक स्मार्टफोनमध्ये ड्युअल सीमकार्डची सुविधा असल्याने सर्व जण दोन नंबरचा वापर करतात. मात्र काही जण दोन पेक्षा जास्त सीमचा वापर करत असतात. या अनुषंगाने दूरसंचार मंत्रालयाने आता याच लोकांसाठी नियमात बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याच्या अंतर्गत आता नऊ पेक्षा अधिक सिमकार्ड वापरणार्‍यांना आता पुन्हा व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. जर ग्राहकांनी पुन्हा व्हेरिफिकेशन केलं नाही, तर त्यांची सिमकार्ड बंद करण्यात येतील. जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतातील राज्यांसाठी ही संख्या सहा इतकी निश्चित करण्यात आलीये. म्हणजे या राज्यांमधील जे नागरिक सहापेक्षा जास्त सीमकार्ड वापरतील त्यांना नव्याने व्हेरिफिकेशन करावे लागेल.

दरम्यान, केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने जारी केलेल्या नियमानुसार ग्राहकांनी व्हेरिफिकेशन केलं नाही, तर त्यांची सिमकार्ड आता बंद करण्यात येतील. ग्राहकांकडे परवानगीपेक्षा अधिक सिमकार्ड आढळल्यास त्यांना आपल्या मर्जीनं सिमकार्ड सुरू ठेवणं किंवा बंद ठेवण्याचा पर्याय देण्यात आला असल्याचं दूरसंचार विभागानं जारी केलेल्या आदेशात नमूद केलं आहे. आर्थिक फसवणूक, आपत्तीजनक कॉल, फसवणूकीच्या घटनांच्या तपासासाठी विभागानं यासंदर्भात पाऊल उचललं आहे. जे नियमानुसार वापर करत नाहीत, ते सर्व मोबाईल क्रमांक डेटाबेसमधून हटवण्याचे निर्देशही दूरसंचार कंपन्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, ज्या ग्राहकांकडे ९ पेक्षा अधिक सिमकार्ड असतील त्यांना नोटीफिकेशन पाठवण्यात यावं, अशा सिमकार्डावरील आऊटगोईंग कॉल्स ३० दिवसांच्या आत, तर इनकमिंग कॉल्स ४५ दिवसांच्या आत बंद करण्याचे निर्देश कंपन्यांना विभागानं दिले आहेत. तसेच ज्यांच्याकडे अधिक सिमकार्ड्स असतील त्यांना ते सरेंडर करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.

Protected Content