फॅक्ट चेक : ओबीसींच्या आरक्षण विरोधातील याचिकाकर्ता जळगाव भाजपचा पदाधिकारी ?

जळगाव जितेंद्र कोतवाल | सुप्रीम कोर्टात ओबीसींचे आरक्षण घालविण्यासाठी याचिका दाखल करणारे राहूल रमेश वाघ हे जळगाव भाजपमधील पदाधिकारी असून त्यांनी संघ व भाजपच्या मदतीने ओबीसींच्या आरक्षणावर घाला घातला असल्याचा गंभीर आरोप ओबीसी विचारवंत हरी नरके यांनी केला आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्यामागे भाजपच्या जळगाव येथील पदाधिकार्‍याचा हात असल्याच्या पुष्टर्थ त्यांनी छायाचित्रे देखील जोडली असून सोशल मीडियात याबाबत प्रचंड चर्वण सुरू झाले आहे. आम्ही या संदर्भातील फॅक्ट चेक केले असता वेगळेच आढळून आले. पहा या संदर्भातील लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा एक्सक्लुझीव्ह वृत्तांत.

याबाबत वृत्त असे की, ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला राहूल रमेश वाघ यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. यावर निकाल देतांना कालच सुप्रीम कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतांना ख्यातनाम ओबीसी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी संबंधीत याचिकाकर्ता हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे सांगत आरक्षण रद्दमागे संघ-भाजप असल्याचा जाहीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारच्या चार मंत्रालयांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

या संदर्भात प्रा. हरी नरके यांनी सविस्तर फेसबुक पोस्ट लिहली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की,-

ओबीसी राजकीय आरक्षण कोणामुळे गेले? – प्रा. हरी नरके

हे राजकीय आरक्षण नष्ट करण्याचे पाप रा.स्व. संघ, भाजपा, मोदी, फडणवीस , याचिकाकर्ते भाजपाचे जळगावचे सरचिटणीस राहुल रमेश वाघ आणि या राज्य सरकारची ४ खाती यांचे आहे. यांच्यामुळेच हे आरक्षण गेले. हा अध्यादेश काढण्याचा आग्रह विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचा होता.त्यांनी २ सर्वपक्षीय बैठकांमध्ये हा हट्ट धरला. विधी व न्याय विभागाच्या अधिकार्‍यासोबत फडणवीसांनी बैठका घेतल्या. या दोन्ही वटहुकूमांचे शब्दांकन वकील देवेंद्र फडणवीस यांचे आहे.सरकारने वकील नेमले तेही फडणवीस यांची शिफारस होते ते.

हे भाजपावाले किती खोटारडे नी दुटप्पी आहेत त्याचा पुरावा हा की ह्या वटहुकुमाला आव्हान दिले ते वाघ भाजपचे आजही पदाधिकारी आहेत. त्यांची मोदी, फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी सलगी असल्याचे फोटो सोबत जोडले आहेत. हा अध्यादेश टिकणार नाही हे मी तो काढला त्याचदिवशी मिडियासमोर बोललो होतो, वर्तमानपत्रात लिहिलेही होते. त्यात अनपेक्षित काहीही नाही.

मोदी तयार ओबीसी डेटा देत नाहीत. २०२१ च्या नव्या जनगणनेत तो जमवणारही नाहीत असे लोकसभेला त्यांनी सांगितले आहे. डेटा द्या अशी विनंती करून राज्य थकले. सर्वोच्च न्यायालयात याचिकाही केली, त्याच्यावर निकाल न्यायालय देत नाहीत. मात्र डेटा नाही तर आरक्षण नाही असा निकाल झटपट दिला जातो. जातीचे भांडवल असणार्‍यांच्या १०% ईडब्ल्यूएस आरक्षणाची मात्र ३ वर्षात एकही सुनावणी घेतली जात नाही. ते गुजरात व मद्रास हायकोर्टानी रद्द केलेले असतानाही त्याला स्थगिती दिली जात नाही हे न्यायालयाचे वागणे क्लेशकारक आहे. न्याय होणेपूरेसे नाही, तो झालाय असे जनतेला वाटणे आवश्यक आहे.

राज्य शासनाच्या ४ खात्यांमध्ये समन्वयच नाही. एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ ९ महिन्यात चकार शब्द बोलत नाहीत. वडेट्टीवार फक्त बोलतात पण त्यांचे खात्याचे याबद्दलचे काम हलत नाही,पुढे जात नाही, राज्य आयोगाला ना निधी, ना जागा ना कर्मचारी, परिणामी ओबीसी डेटाचे काम मात्र ठप्प आहे.

न्यायालयाचा दृष्टिकोन कठोर, केंद्र विरोधात, राज्यातला विरोधी पक्ष ओबीसी द्वेष्टा, प्रशासन आणि खात्यांचे मंत्री निष्क्रिय, असे सगळे ओबीसीच्या मुळावर आलेले. मोले घातले रडाया!

ओबीसी जोवर जागृत होत नाहीत तोवर असेच घडणार!

– प्रा. हरी नरके

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे राहूल रमेश वाघ हे जळगाव भाजपचे पदाधिकारी असल्याचे त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजसह ट्विटर हँडलवर स्पष्ट केले आहे. त्यांनी आपण भाजपचे महानगर सचिव असल्याचे नमूद केले आहे. तर अन्य ग्राफीक्समध्ये त्यांनी भाजपच्या मंडळ क्रमांक नऊचे अध्यक्ष असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या तमाम नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो देखील प्रा. हरी नरके यांनी जाहीर केले आहेत.

खाली आपण प्रा. हरी नरके यांची मूळ पोस्ट बघू शकतात.

मात्र या संदर्भात राहूल रमेश वाघ यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी आपण या प्रकारची कोणतीही याचिका कोर्टात दाखल केलेली नसल्याचे स्पष्ट केले. आपण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असून मी स्वत:, माझे नेते आणि माझा पक्ष हा ओबीसी आरक्षणाच्या बाजूचे आहोत. यामुळे या आरक्षणाच्या विरोधात आम्ही कधीही जाणार नाहीत. मी या संदर्भात कोणतीही याचिका दाखल केलेली नाही. ही याचिका धुळे येथील ऍडव्होकेट राहूल रमेश वाघ यांनी दाखल केलेली आहे. नाव सारखे असल्यामुळे प्राध्यापक हरी नरके यांनी माझ्या फेसबुक प्रोफाईलवरील फोटो शेअर करून भारतीय जनता पक्ष ओबीसी आरक्षणाच्या विरोधातील असल्याचा दावा केला आहे. मात्र असे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या संदर्भात आम्ही अजून शोध घेतला असता धुळे येथील ऍडव्होकेट राहूल रमेश वाघ यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकल्याचा एका व्हिडीओचा संदर्भ आढळून आला असून आपण तो खाली बघू शकतात. यामुळे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकणारे राहूल रमेश वाघ हे जळगाव भाजपचे पदाधिकारी नव्हेत तर धुळे येथील विधीज्ज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या संदर्भात व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि प्रा. हरी नरके यांचा दावा खोटा असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

खालील व्हिडीओ हा ओबीसी आरक्षणाबाबत याचिका दाखल करणारे ऍड. राहूल रमेश वाघ यांचा आहे.

Protected Content