जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण असताना जळगाव महानगरपालिकेने उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला. तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेल्याने शनिवारी दुपारी शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य रस्त्यांवर टँकरद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या ‘वॉटर शॉवर’ उपक्रमामुळे शहरात काही प्रमाणात थंडावा निर्माण झाला.
उन्हाच्या तीव्र लाटेमुळे दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः तापून निघत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेने दोन टँकरच्या सहाय्याने महत्त्वाच्या चौकांमध्ये पाणी मारण्याची मोहीम राबविली. विशेष म्हणजे हे दोन्ही टँकर महापौर दीपमाला काळे यांनी स्वतःच्या वतीने उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली.

चित्रा चौक, कोर्ट चौक, नवीन बसस्थानक परिसर, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, नेहरू चौक आणि टॉवर चौक अशा शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील तापमानात काही प्रमाणात घट जाणवली असून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तात्पुरता का होईना, दिलासा मिळाला. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करत महापालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान शहर अभियंता योगेश बोरोले, पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उपस्थित राहून कामकाजावर लक्ष ठेवत होते. उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या उपाययोजना आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिका प्रशासनाकडून आगामी दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढल्यास अशा स्वरूपाचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. उष्णतेच्या लाटेचा सामना करताना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सावलीची व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी थंडावा निर्माण करणाऱ्या उपाययोजनांवरही प्रशासनाचा भर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



