Home Cities जळगाव महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांकांद्वारे सुरक्षा जनजागृती मोहीम

महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांकांद्वारे सुरक्षा जनजागृती मोहीम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी या उद्देशाने जळगावमध्ये नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विविध महत्त्वाच्या हेल्पलाईन क्रमांकांची माहिती देत महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

महिला व बाल विकास विभाग, जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थिनींना आणि महिलांना आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या सेवांचा उपयोग करावा याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः Women Helpline (1091), Childline (1098) आणि Police Emergency Service (100) या महत्त्वाच्या क्रमांकांची माहिती देत त्यांचा योग्य वापर कसा करावा, यावर प्रकाश टाकण्यात आला. संकटसमयी योग्य निर्णय घेण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये आणि महिलांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवणे, त्यांचा आत्मविश्वास दृढ करणे आणि कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी न घाबरता मदत मागण्याची सवय लावणे हा होता. कार्यक्रमादरम्यान महिलांना विविध प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे परिस्थिती हाताळण्याचे मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष जीवनातही या ज्ञानाचा उपयोग करता येईल.

या उपक्रमासाठी महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे, मुला-मुलींचे बालगृह अधीक्षक रविकिरण अहिरराव, तसेच प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील यांच्यासह आशा मौर्य, रेणुका हिंगू, वंदना मंडावरे, राधिका पाटील, विश्वनाथ फेगडे, राजेंद्र सूर्यवंशी, शरयू पाटील आणि अथर्व पाटील हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound