Home आरोग्य अपघातात मेंदूला गंभीर दुखापत; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवला जीव

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवला जीव


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याला नवजीवन दिले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती स्थिर असून तो हळूहळू बरा होत असल्याने रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेला आणखी एक यश मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित गजानन पवार हा २३ वर्षीय तरुण भुसावळ येथील रहिवासी असून तो कंपनीत कामासाठी जात असताना दुचाकी घसरून अपघातग्रस्त झाला. या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर त्याच्या शरीराच्या हालचाली मंदावल्या होत्या तसेच हात-पायांची ताकदही कमी झाली होती. परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल होताच मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड आणि त्यांच्या टीमने तातडीने रुग्णाची तपासणी सुरू केली. रुग्णाच्या गंभीर स्थितीचा विचार करून सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये ‘लेफ्ट पेरिएटल डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर विथ हिमॅटोमा’ असल्याचे स्पष्ट झाले. डोक्याच्या डाव्या बाजूच्या हाडाला खोलवर फ्रॅक्चर होऊन मेंदूत रक्त साचल्याने रुग्णाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता.

स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. राठोड आणि त्यांच्या टीमने क्षणाचाही विलंब न करता तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ‘लेफ्ट पेरिएटल क्रेनिओटोमी विथ एक्सीजन ऑफ डिप्रेस्ड पार्ट ऑफ स्कल अँड इव्हॅक्युएशन ऑफ हिमॅटोमा’ या अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत जखमी भागातील दाबलेले हाड काढण्यात आले तसेच मेंदूमध्ये साचलेले रक्त सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.

यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येत असून शरीराच्या हालचाली पूर्ववत होत आहेत. हात-पायांची ताकदही वाढत असल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. विपूल राठोड यांना डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, भूलतज्ज्ञ डॉ. सतीश तसेच आयसीयू विभागातील शालिक चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले.

या यशस्वी उपचारानंतर डॉ. प्रितम दास यांनी ‘गोल्डन अवर’चे महत्त्व अधोरेखित केले. डोक्याच्या गंभीर दुखापतींमध्ये अपघातानंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य वेळी रुग्णालयात दाखल केल्यास आणि तातडीने उपचार व शस्त्रक्रिया केल्यास जीव वाचवणे शक्य होते, असे त्यांनी सांगितले. उपचारात विलंब झाल्यास मेंदूवर कायमस्वरूपी परिणाम किंवा जीवितहानी होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी नागरिकांना दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि अपघात झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याचा पुन्हा प्रत्यय आला असून गंभीर मेंदूविकार उपचारात रुग्णालयाने विश्वासार्हता सिद्ध केल्याची भावना व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound