Home Cities जळगाव कडाक्याच्या उन्हाने नागरिक त्रस्त ; पाणपोई ठरतेय दिलासा

कडाक्याच्या उन्हाने नागरिक त्रस्त ; पाणपोई ठरतेय दिलासा

0
124


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, शनिवारी जळगाव शहराचे तापमान तब्बल ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले. प्रखर उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

उन्हाच्या झळा इतक्या तीव्र आहेत की, घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. शनिवार असल्याने आठवडे बाजार आणि इतर कामांसाठी नागरिकांना बाहेर पडावे लागले, मात्र सूर्याच्या तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करताना ते दिसून आले. दुचाकीस्वार आणि पादचारी चेहरा पूर्णपणे रुमाल, स्कार्फ किंवा कापडाने झाकून प्रवास करत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळाले. साध्या प्रवासातही अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समाजसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. तहानलेल्या नागरिकांसाठी आणि वाटसरूंसाठी मुख्य चौकांमध्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. या पाणपोईंमुळे उन्हात फिरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, कामगारांना आणि मजुरांना मोठा दिलासा मिळत आहे. थंड पाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर या सुविधांचा लाभ घेत आहेत.

आरोग्य विभागानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे तसेच सुती कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. उन्हाचा त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound