आंदोलनामध्ये सातशे शेतकर्‍यांचा मृत्यू : राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | शेतकरी आंदोलनांमध्ये सुमारे सातशे शेतकर्‍यांचा मृत्यू झाला असून केंद्र सरकारकडे याबाबत माहिती नसल्याच्या कारणावरून आज खासदार राहूल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि नोकरी द्यायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी लोकसभेत केली.  शेतकरी आंदोलनादरम्यान सुमारे ७०० शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. पंतप्रधानांनी देशाची आणि देशातील शेतकर्‍यांची माफी मागितली. त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. पण केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आंदोलनादरम्यान किती शेतकर्‍यांचा मृत्यू झाला असा सवाल केला होता. पण त्यांच्याकडे याची माहिती नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

पंजाब सरकारने ४०० शेतकर्‍यांना प्रत्येकी ५ लाखांप्रमाणे नुकसान भरपाई दिली आहे; त्यापैकी १५२ जणांना नोकर्‍याही दिल्या. माझ्याकडे मृत शेतकर्‍यांची यादी आहे. आम्ही हरियाणातील ७० शेतकर्‍यांची दुसरी यादी तयार केली आहे. पण तुमचे सरकार म्हणते की शेतकर्‍यांची नावे नाहीत, असे राहुल गांधी यांनी लोकसभेत निदर्शनास आणून दिले. त्यांनी लोकसभेत शेतकर्‍यांची यादी दाखवत केंद्र सरकारच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शेतकर्‍यांना त्यांचे हक्क मिळायला हवेत. त्यांना नुकसान भरपाई सोबतच नोकर्‍या मिळायला हव्यात, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी  यांनी उपस्थित मुद्यांवर सरकारडून उत्तर दिले नसल्याबद्दल कॉंग्रेस खासदारांनी सभात्याग केला.

 

Protected Content