महागला कांदा, ग्राहकांचा वांदा पण शेतकऱ्याला झाला का फायदा ?

ONIONS

चाळीसगाव, दिलीप घोरपडे | गेल्या आठ-दहा दिवसांपासून कांदा महाग झाला, कांद्याने डोळ्यात पाणी आणले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, अशा प्रकारच्या बातम्या मीडियामधून मधून मोठ्या प्रमाणावर दाखवल्या जात आहेत. मात्र कांदा महाग का झाला ? याचा तपास तरी करण्यात आला आहे का ? आज ज्या शेतकऱ्याला एकरी ८० ते ९० क्विंटल कांद्याचे उत्पादन व्हायचे, त्याला आज एकरी फक्त १० ते १२ क्विंटल उत्पादन झाले आहे.

 

याचे कारण कांद्याचे रोप तयार करण्यासाठी बियाणे जमिनीत टाकल्यानंतर आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर जमिनीतील बिजवाई पाण्यात वाहून गेली. यानंतर जे काही रोप उगवले त्याची लागवड झाली आणि मजुरी खत सगळा खर्च झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात कांद्याची वाढ झाली. पुन्हा परतीच्या पावसाने थैमान घातले, या पावसात जमिनीत असलेला कांदा मोठ्या प्रमाणावर सडून गेला. जो राहिला, त्याची वाढ खुंटली, परिणामी शेतातील कांदा पातळ झाला आणि वाढ खुटल्यामुळे वजनात घट झाली म्हणून ज्या शेतात ८० ते ९० क्विंटल कांदा पिकायचा त्याच शेतातील कांद्याचे उत्पादन आता १० ते १२ क्विंटल येऊन ठेपले. आवक घटली आणि भाव वाढले मात्र शेतकऱ्यांचा झालेला खर्च कमी झाला का ? त्याच्या उत्पन्नात घट झाली मात्र खर्चात कुठल्याही प्रकारची घट झाली नाही. मग १० पट भाव वाढला असला तरी १० पट उत्पन्नात घट झाली. मग वाढलेल्या या भावाचा शेतकऱ्याला काय फायदा तो आहे तिथेच आहे. सर्वसामान्य माणसाला कांद्याचा वाढलेला भाव दिसतो, शेतकऱ्याचे घटनेने उत्पन्न आणि झालेला खर्च दिसत नाही. म्हणूनच कांदा खरंच महाग झाला का आणि झाला असेल तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला का ? असा सवाल निश्चितच निर्माण होतो. शेतकऱ्याच्या या अवस्थेचा सर्वसामान्य माणसाने विचार केला पाहिजे. शेतकरी सतत नुकसान सहन करत असतो, कधीतरी एखाद्या वेळेस त्याच्या मालाला चांगला भाव मिळाला तर आपण महागाई झाली म्हणून ओरड करतो. त्याच वेळेस शेतकऱ्याचे उत्पन्न घटलेले असते हे आपण पाहत नाही. शेतकरी ढिगाने माल विकतो आपल्याला तो खूप दिसतो, म्हणून स्वस्त गेला तर काय फरक पडतो, अशी मानसिकता सर्वसामान्यांची होते. मात्र त्यामागे शेतकऱ्याचे किती कष्ट आहेत याचा विचार होणे देखील गरजेचे आहे. कांदा कधी स्वस्त होतो, अगदी ५ ते १० रुपये किलोने देखील विकला जातो. मात्र याच कांद्यापासून तयार होणारी पेस्ट बाटलीबंद ४०० रुपये किलो विकली जाते. ती कधी स्वस्त होत नाही, ती मुकाट्याने घेतली जाते. टमाटा एखाद्यावेळेस महाग होतो, मात्र बऱ्याच वेळेस ५ रुपये १० रुपये किलोने विकला जातो. काही वेळेस फेकून द्यावा लागतो, मात्र याच टमाट्या पासून तयार होणारा बाटलीबंद टोमॅटो सॉस कधी स्वस्त होत नाही. तोही आपण मुकाट्याने घेतो. शेतकऱ्याला एखाद्यावेळेस दोन पैसे मिळाले आणि त्याच्या प्रपंचाला हातभार लागला तर महागाई महागाई बोलण्यात काय अर्थ आहे. आपण सगळे शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो आहोत. असा विचार करून शेतकऱ्याचा विचार केल्यास शेतमालाला भाव वाढवून मिळाला तर आपल्याला कधीही वाईट वाटणार नाही.

Protected Content