Home क्राईम उसने पैसे मागितल्याच्या रागातून तरुणाला धमकी व मारहाण

उसने पैसे मागितल्याच्या रागातून तरुणाला धमकी व मारहाण


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली आहे. उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी अविनाश शरद अहिरे (वय २२) याने संशयित आरोपी सचिन धोंडू अहिरे याला ऊस तोडीच्या कामासाठी आणि घरगुती कारणासाठी काही रक्कम उसने म्हणून दिली होती. ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास इंदिरा नगर परिसरात अविनाशने सचिन अहिरे याच्याकडे आपल्या हक्काचे पैसे परत मागितले. मात्र, पैसे देण्याऐवजी सचिनने वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. सचिन अहिरे आणि त्याचा साथीदार सागर दीपक जाधव (रा. शिरगाव) यांनी अविनाश याला शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर, सचिनने अविनाशचा उजवा हात जोरात पिरगळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. “आम्ही तुझे पैसे देणार नाही, तुला काय करायचे आहे ते करून घे,” अशी धमकी दिली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound