जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील समता नगर शेजारील देवेंद्र नगर परिसरात स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्येच राहण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी करूनही कचरा उचलला जात नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, घंटागाडी नियमित येत असली तरी ती आधीच भरलेली असल्याने परिसरातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे घराजवळच कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरत आहे. झाडू मारणारे आणि गटारी साफ करणारे कर्मचारी नियमित येत नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. कचरा पेट्यांची कमतरता असल्याने नागरिकांना कचरा उघड्यावर टाकावा लागत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.

परिसरातील भिंतीलगत साचलेल्या कचऱ्यातून दिवसभर असह्य दुर्गंधी येत असून, प्लास्टिक कचरा गटारात जाऊन पाणी निचऱ्याला अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसातून दोन वेळा स्वतःच साफसफाई करावी लागत असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक नगरसेवकांकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अर्जुन रडे यांनी केला आहे.
दरम्यान, शहर स्वच्छ ठेवण्याचा दावा करणाऱ्या महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नगरसेवक नितीन बरडे यांनी आरोप केला की, काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायाधीशांच्या निवासस्थानाशेजारी माती टाकून ती बीव्हीजी कंपनीकडून वजन करून विकण्यात आली आणि त्याचे पैसे महापालिकेकडून दिले जाणार आहेत. मात्र, देवेंद्र नगरातील कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नगरसेवक नितीन बरडे आणि स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “ठेकेदार केवळ आर्थिक फायद्यासाठी महापालिकेला चुना लावत आहे आणि नागरिकांना घाणीत राहावे लागत आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.



