नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एफएमईजी म्हणजेच फास्ट मुव्हींग इलेक्ट्रीकल गुडस क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी असलेल्या जळगाव येथील स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आपल्या विस्ताराची घोषणा करत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे मेगा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे चेअरमन दीपक चौधरी यांचा यानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
जळगाव येथे मुख्यालय असलेली स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी प्रगतीपथावरून विलक्षण वेगाने आगेकूच करत असून आता कंपनीने आपल्या विस्ताराची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक येथे दिनांक ६ मे रोजी भव्य उद्योग कुंभाचे आयोजन करण्यात आले. यात विविध उद्योग समूहांशी सामंजस्याचे करार करण्यात आले. याच भव्य कार्यक्रमात स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजच्या वतीने करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली.

स्पेक्ट्रम कडून या प्रकल्पासाठी सुमारे 110 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, यामुळे 525 हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याने परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिंडोरी येथील औद्योगिक हबमध्ये उभारण्यात येणारा हा प्रकल्प कंपनीच्या विस्ताराच्या धोरणातील महत्त्वाचा भाग ठरणार असून, उत्पादन क्षमता वाढविण्यासह अत्याधुनिक उत्पादन व्यवस्थेला चालना देणार आहे. अर्थात या माध्यमातून स्पेक्ट्रमच्या विस्ताराला बळ देखील मिळणार आहे.
स्पेक्ट्रमच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून या कार्यक्रमात मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेक्ट्रमचे चेअरमन दीपक चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे संचालक देवेंद्र राणे यांची देखील उपस्थिती होती. स्पेक्ट्रम कंपनीने आधीच प्रचंड गतीने विस्तार सुरू केला असून अलीकडेच अलरीक या ब्रँडच्या माध्यमातून बी-टू-सी या प्रकारातील बाजारपेठेत पदार्पण केले असून याला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे.
स्पेक्ट्रमच्या जळगाव नजीकच्या उमाळा येथील मुख्यालयात मोठ्या प्रमाणात विस्तार सुरू असतांना आता कंपनीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे नव्या भव्य प्रकल्पाची घोषणा करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
दरम्यान, स्पेक्ट्रमच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात, कंपनीने या ऐतिहासिक क्षणाला केवळ यशाचा उत्सव न मानता, अधिक जबाबदारीची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विस्तारासोबत गुणवत्ता, उत्कृष्ट अंमलबजावणी आणि नवकल्पनांना प्राधान्य देत पुढील वाटचाल करण्याचा निर्धार कंपनीने व्यक्त केला आहे. स्पेक्ट्रम परिवारात या प्रकल्पामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “आज निर्माण होत असलेली ही परंपरा उद्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरेल,” असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.



