रावेर तालुक्यात भाजपाची नवीन रणनिती; तीन तालुकाध्यक्षांची घोषणा

रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रावेर तालुक्यात एक नवी राजकीय रणनीती आखली आहे. प्रथमच तालुक्यात तीन वेगवेगळ्या तालुकाध्यक्षांची नियुक्ती करून भाजपाने संघटनात्मक बळकटीकडे वाटचाल सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

रावेर येथे झालेल्या भाजपाच्या जाहीर बैठकीत रावेर पूर्व तालुकाध्यक्षपदी रविंद्र पाटील, रावेर पश्चिम तालुकाध्यक्षपदी ॲड. सूर्यकांत देशमुख तर सावदा मंडळ तालुकाध्यक्षपदी दुर्गादास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या तिघांची निवड वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून, त्यांच्या निवडीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, आ. अमोल जावळे यांचे मार्गदर्शन लाभले. बैठकीस सुरेश धनके, नंदकिशोर महाजन, केतकीताई पाटील, रंजनाताई पाटील, प्रल्हाद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाने या नियुक्त्या करताना सामाजिक समावेश, भौगोलिक प्रतिनिधित्व आणि संघटनात्मक मजबुती या तत्त्वांना प्राधान्य दिले आहे. सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून भाजपने आगामी निवडणुकांसाठी भक्कम संघटना उभारण्याचा निर्धार दर्शवला आहे.

Protected Content